

Mary Kom Onler Karong row
नवी दिल्ली : भारताची दिग्गज बॉक्सर आणि पाचवेळा जागतिक विजेतेपद भूषवणारी मेरी कोम सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मेरी कोम आणि तिचा माजी पती ओन्लर यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आला असून, दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. "लग्नानंतर ओन्लरने संसारासाठी कोणतेही योगदान दिले नाही, उलट तो माझ्या कमाईवर जगत होता," अशा शब्दांत मेरी कोमने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर ओन्लरचे यानेही "मी तिचा ड्रायव्हर झालो, तिचा स्वयंपाकी झालो. मी तिच्यासाठी गुलाम म्हणून राहिलो, असे प्रत्युत्त दिले आहे.
मेरी कोम आणि ओन्लर याचा घटस्फोट झाला आहे. आपल्या नात्याबाबत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मेरी कोम म्हणाली, "कसली यशस्वी कारकीर्द? तो फक्त गल्लीत फुटबॉल खेळायचा. खरं सांगायचं तर, लग्नाच्या वेळी तो एक रुपयाही कमावत नव्हता. त्याने काय त्याग केला? तो सकाळ-संध्याकाळ फक्त घरी झोपून असायचा."
मेरीने पुढे असाही आरोप केला की, ती रिंगमध्ये घाम गाळून पैसे कमवत असताना ओन्लरने तिचे बँक खाते रिकामे केले. "एका मुलीच्या कमाईवर तो जगत होता, याचे मला खूप वाईट वाटते. मी खूप मेहनत करून पैसे कमवले, माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. पण नंतर मला समजले की माझे बँक खाते पूर्णपणे रिकामे झाले आहे," असे मेरीने संतापून सांगितले.
मेरी कोमच्या या आरोपांनंतर ओन्लरनेही आपली बाजू मांडली आहे. त्याने मेरीचे सर्व दावे फेटाळून लावत तिला प्रतिप्रश्न केले आहेत. निवडणुकीत पैसे खर्च केल्याच्या आरोपावर ओन्लर म्हणाला, "तिनेच मला राजकारणात उतरण्यासाठी भाग पाडले होते. २०१६ मध्ये जेव्हा तिचा राज्यसभा खासदारकीचा कार्यकाळ संपत आला, तेव्हा तिनेच मला निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला होता." नोकरीबाबत स्पष्टीकरण देताना ओन्लर म्हणाला की, "जेव्हा आम्ही भेटलो, तेव्हा मी यूपीएससीची (UPSC) तयारी करत होतो आणि शिलाँगच्या अबकारी विभागात हंगामी फुटबॉलपटू होतो. पण मेरीनेच मला तिची कारकीर्द घडवण्यासाठी माझी स्वप्ने सोडण्याची विनंती केली. तिच्या बॉक्सिंगवरील प्रेमापोटी मी मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी स्वीकारली."
पारंपारिक कौटुंबिक चौकटी मोडून आपण घराची जबाबदारी सांभाळल्याचे ओन्लरने सांगितले. "मी तिचा ड्रायव्हर झालो, तिचा स्वयंपाकी झालो. मी तिच्यासाठी गुलाम म्हणून राहिलो, पण माझ्या नजरेत ते सर्व प्रेमापोटी होते. आज ती माझ्याबद्दल इतके अपमानास्पद शब्द वापरत आहे, हे दुर्दैवी असल्याचेही त्याने नमूद केले आहे.