कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
मराठा लाईट इन्फंट्री, हनुमान ब्लेसिंग, एस. डी. पाटील ट्रस्ट व तडाका तालीम यांनी आपआपल्या प्रतिस्पर्ध्यांना नमवत वरिष्ठ गट हॉकी स्पर्धेत आघाडी मिळविली. जय शिवराय फुटबॉल प्लेअर तरुण मंडळ लाड चौक व महाराष्ट्र क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा मनपाच्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर सुरू आहे.
पहिल्या सामन्यात मराठा लाईट इन्फंट्री संघाने श्याम स्पोर्टस्चा 8-0 अशा गोलफरकाने पराभव केला. मराठा लाईटच्या गिरीधर लोहारने तीन, महेश शिंदे, संकेत पाटील, अजय लाकरा, प्रथमेश शिपुगडे व रईस मुजावर यांनी प्रत्येकी एक गोल केला. उत्कृष्ट खेळाडू म्हणून श्याम स्पोर्टस्च्या प्रतीक नलवडेला गौरविण्यात आले. दुसर्या सामन्यात हनुमान ब्लेसिंग संयुक्त लाईन बाझार संघाचा पराभव केला. अमर बंद्रे, माधव तोरसकर, धीरज पाटील यांनी गोल केले. उत्कृष्ट खेळाडू म्हणून संयुक्तच्या अभी गवळी याला गौरविण्यात आले. तिसर्या सामन्यात एस. डी. पाटील ट्रस्ट (इस्लामपूर) संघाने जयहिंद व्यायाम मंडळ (सांगली ) संघाचा 8-1 असा पराभव केला. इस्लामपूरच्या साईराज जाधव, सूरज माने, शंभूराजे शिंदे , पंकज पाटील व विजय जाधव यांनी नोंदवले तर जय हिंदच्या शुभम कांबळेने एकमेव गोल केला. उत्कृष्ट खेळाडू म्हणून जयहिंदच्या श्रेयस गवळी याची निवड करण्यात आली. तडाका तालीम मंडळाने डी. एन. एफ.( इचलकरंजी) संघाचा 4-0 असा पराभव केला. ओंकार निकम, आकाश शिंदे, सोहेल शेख व मंगेश खोत यांनी नोंदवले.