

पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू भाकर हिला देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकित खेळाडूंच्या यादीतून वगळण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती व्ही रामसुब्रम यांच्या अध्यक्षतेखालील १२ सदस्यीय राष्ट्रीय क्रीडा दिन समितीने प्रतिष्ठित खेलरत्न पुरस्कारासाठी मनू भाकरच्या नावाची शिफारस केली नसल्याचे सोमवारी स्पष्ट झाले होते. यावर मनू भाकरचे वडील राम किशन भाकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुलीला नेमबाजऐवजी क्रिकेटर बनवायला हवे होते. यामुळे तिला अधिक ओळख मिळाली असती, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. (Manu Bhaker Khel Ratna row)
'पीटीआय'ला दिलेल्या मुलाखतीत राम किशन भाकर म्हणाले की, मनूला नेमबाजी हा क्रीडा प्रकार निवडायला लावला याबद्दल मला खेद वाटतो. त्याऐवजी मी तिला क्रिकेटर बनवायला हवं होतं; मग, सर्व पुरस्कार आणि प्रशंसा तिच्या वाट्याला आली असती. मनूने एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन ऑलिम्पिक पदके जिंकली, आजवर देशात अशी कामगिरी कोणीही केलेली नाही. माझ्या मुलीने देशासाठी आणखी काय करावे अशी तुमची अपेक्षा आहे, सरकारने तिचे प्रयत्न ओळखले पाहिजेत," असेही त्यांनी सरकारला सुनावले.
खेलरत्न पुरस्कार नामांकित खेळाडूंच्या यादीतून वगळण्यात आल्याने मनू निराश झाली आहे. ऑलिम्पिकमध्ये जाऊन देशासाठी पदके जिंकायला नको होती. खरे तर मी खेळाडूच बनायला नको होते', असे तिने मला सांगितल्याचेही तिच्या वडिलांनी म्हटलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती व्ही रामसुब्रम यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सर्वोच्च क्रीडा सन्मान मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी मनू भाकरच्या नावाची शिफारस केली नसल्याचे साेमवारी स्पष्ट झाले. मनू भाकरने पुरस्कारासाठी अर्ज केला नसल्याचे क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. तर आम्ही खेलरत्न पुरस्कारासाठी अर्ज केला होता;पण समितीने आमच्या अर्जाचा विचारच केला नाही, असा दावा मनू भाकरचे वडील राम किशन यांनी केला आहे.