

दोहाः वृत्तसंस्था
कतारमधील दोहा येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत भारताच्या मनू भाकर आणि ईशा सिंग यांना महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकचा कोटा मिळवण्यात अपयश आले आहे. वैयक्तिक प्रकारात पदक आणि ऑलिम्पिक कोटा मिळवण्याची ही मोठी संधी भारताने गमावली.
मनू भाकर, ईशा सिंग आणि दिव्या थडिगोल सुब्बाराजू या भारतीय त्रिकुटाने २५ मीटर पिस्तूल प्रकारात सांघिक सुवर्णपदक जिंकून देशाची मान उंचावली. मात्र, याच कामगिरीची पुनरावृत्ती त्यांना वैयक्तिक अंतिम फेरीत करता आली नाही.
दोन वेळची ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती मनू भाकर अंतिम फेरीत काही शूट-ऑफ पार करत पदकाच्या रेसमध्ये टिकून होती, पण अखेर २७ हिट्ससह ती चौथ्या स्थानावर राहिली आणि तिचे पदक अवघ्या दोन हिट्सने हुकले. पात्रता फेरीत ५९० गुणांसह अप्रतिम कामगिरी करणाऱ्या ईशा सिंगला अंतिम फेरीत सूर सापडला नाही. २० पैकी केवळ ११ हिट्स नोंदवून ती आठव्या (शेवटच्या) स्थानावर राहिली. या स्पर्धेत एकूण ३६ ऑलिम्पिक कोटा स्थाने उपलब्ध आहेत, परंतु भारतीय खेळाडूंची निराशाजनक कामगिरी सुरूच राहिली.
या स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकांवर राहिलेल्या दक्षिण कोरियाच्या यांग जीन (सुवर्णपदकासह जागतिक विक्रम), व्हिएतनामची ट्रिन थू विन्हा (रौप्य) आणि चीनची झांग युएयुए (कांस्य) यांनी ऑलिम्पिक कोटा निश्चित केला. आयएसएसएफ जागतिक अजिंक्यपद नेमबाजी या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतून भारताला आतापर्यंत पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात केवळ जयपाल मालवीय यानेच एकमेव ऑलिम्पिक कोटा मिळवून दिला आहे. लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकसाठी अद्याप पुरेसा वेळ शिल्लक असल्याने, आगामी आगामी जागतिक कप आणि पात्रता स्पर्धाद्वारे मनू आणि ईशा यांना ऑलिम्पिक कोटा मिळवण्याच्या आणखी संधी उपलब्ध असतील.