पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या पुढच्या हंगामापुर्वी मेगा ऑक्शन पार पडणार आहे. आता ऑक्शन दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्याआधीच चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी मिळाली आहे. मागील काही आठवड्यापासून एमएस धोनी आयपीएल 2025 मध्ये खेळणार का? हा प्रश्न सतत विचारला जात होता आणि एखाद्या 'ओपन सिक्रेट' प्रमाणे उत्तर सर्वांसमोर होते, पण आता त्याला पुष्टी मिळाली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा माजी दिग्गज कर्णधार धोनी पुढच्या हंगामातही 'यलो जर्सी'मध्ये परतणार आहे. धोनीने स्वतः याची घोषणा केली असून आता एका रिपोर्टनुसार चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ कासी विश्वनाथन यांनीही याला दुजोरा दिला आहे. आयपीएलच्या सलग 18 व्या हंगामात धोनी आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. (MS Dhoni )
क्रिकबझने आपल्या एका रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, एमएस धोनी पुढील सीझनमध्ये देखील खेळताना दिसणार आहे. धोनीच्या व्हायरल व्हिडिओनंतर या निर्णयाची पुष्टी करणाऱ्या फ्रँचायझीचे सीईओ काशी विश्वनाथन यांच्या हवाल्याने हे सांगण्यात आले आहे. कासी विश्वनाथन म्हणाले की जर धोनी तयार असेल तर फ्रँचायझी देखील आनंदी आहे, कारण त्यांना हेच हवे आहे. धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो म्हणत आहे की त्याला त्याच्या कारकिर्दीच्या उर्वरित वर्षांत क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे.
मागील 2-3 हंगामात धोनीच्या आयपीएलमध्ये खेळण्याबाबत सतत शंका निर्माण होत आहे. प्रत्येक हंगामानंतर तो पुढच्या मोसमात परतणार का, असा प्रश्न सर्वांमध्येच निर्माण होतो. 2023 मध्ये संघ आयपीएल चॅम्पियन झाल्यानंतरही असे मानले जात होते की कदाचित तो यासह निवृत्त होईल परंतु चाहत्यांच्या मागणीनुसार धोनीने 2024 च्या मोसमात पुनरागमन केले. परंतु यावेळी त्याने कर्णधारपद सोडले आणि ही जबाबदारी ऋतुराज गायकवाडकडे सुपूर्द केली. मात्र, शेवटचा हंगाम संघासाठी चांगला राहिला नाही त्यामुळे 'सीएसके' प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही.
जोपर्यंत धोनीच्या रिटेन्शनचा संबंध आहे, अहवालात असे म्हटले आहे की, बीसीसीआय च्या नविन नियमानुसार त्याला अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवले जाईल. त्यामुळे फ्रँचायझीला त्याच्यासाठी फक्त 4 कोटी रुपये खर्च करावे लागतील. बीसीसीआय ने आयपीएल 2025 च्या मेगा लिलावासाठी जुना नियम पुन्हा लागू केला आहे, ज्याच्या अंतर्गत कोणत्याही खेळाडूने गेल्या सलग 5 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असेल किंवा गेल्या 5 वर्षांपासून कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्याच्या प्लेइंग 11 चा भाग असेल तर त्याला अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवता येईल