महाथरार..! T-20मध्‍ये सुपर ओव्‍हरची झाली हॅट्‌ट्रिक! (पाहा व्‍हिडिओ)

महाराजा ट्रॉफीमधील सामना तिसर्‍या सुपर ओव्‍हरमध्‍ये निकाली
Maharaja Trophy
महाराजा ट्रॉफीमध्‍ये बेंगळुरू ब्लास्टर्स आणि हुबळी टायगर्स यांच्यात झालेल्या सामन्याचा निकाल तिसर्‍या सुपर ओव्हरमध्‍ये लागला. (Image source- X)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : क्रिकेटमधील टी-20 फॉर्मेट आणि थरार हे एक समीकरण आहे. सामन्‍यात नेमकं काय घडेल? हे शेवटच्‍या क्षणांपर्यंत तुम्‍ही सांगू शकत नाही. याच थरारामुळे क्रिकेटप्रेमीमध्‍ये हे फॉर्मेट कमालीचे लोकप्रिय झाले आहे. मात्र आता क्रिकेटच्‍या इतिहासात कधीच घडलं नाही, असे कर्नाटकात सुरू असलेल्या देशांतर्गत T20 लीगमध्ये घडले आहे. येथे महाराजा ट्रॉफीमध्‍ये बेंगळुरू ब्लास्टर्स आणि हुबळी टायगर्स यांच्यात झालेला सामना एक-दोन नव्हे तर तीन सुपर ओव्हरनंतर निकाल लागला. जाणून घेवूया सामन्‍यात नेमकं काय घडलं याविषयी...

 सामना गेला सुपर ओव्‍हरमध्‍ये

महाराजा करंडक स्पर्धेत शुक्रवारी (दि.२३) बेंगळुरू ब्लास्टर्स आणि हुबळी टायगर्स आमने-सामने होते. बेंगळुरू ब्लास्टर्स नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हुबळीच्‍या मोहम्मद ताहाने ३१, मनीष पांडेने ३३, अनिश्वर गौतमने ३० तर मनवंत कुमारने २७ धावा करत संघाला १६४ धावांपर्यंत पोहचले. प्रत्युत्तरात बंगळुरू ब्लास्टर्सने १६४ धावा केल्‍या. कर्णधार मयंक अग्रवालने ५४ तर सूरजने २६ आणि नवीनने १९ धावा केल्या. सामना टाय झाल्‍याने सुपर ओव्‍हरवर निकाल ठरणार होता.

पहिल्‍या दोन सुपर ओव्‍हरही बरोबरीत!

पहिल्या सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांनी १०-१० धावा केल्या. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांनी ८-८ धावा केल्या. आता सामना निकाली काढण्‍यासाठी तिसरी सुपर ओव्‍हर खेळविण्‍यात आली.

तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये हुबळी टायगर्सने मारली बाजी

तिसर्‍या सुपर ओव्‍हरमध्‍ये बंगळूरुने १२ धावा केल्‍या. मनीष पांडेच्या नेतृत्वाखालील हुबळी टायगर्सला तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये सामना निकाली काढण्‍यासाठी १३ धावांची गरज होती. मनवंत कुमारने पहिल्या चेंडूवर दोन धावा केल्‍या. तर दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. यानंतर एक चेंडू विनाधाव गेला. तर पुढचा चेंडू वाईड ठरला.. मनीषने पाचव्या चेंडूवर एक धाव घेतली. हुबळी टायगर्सला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर चार धावांची गरज होती. मनवंतने लेग साईडवर चौकार मारत हुबळी टायगर्सचा विजय निश्‍चित केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news