

Lungi Ngidi Injured
दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला. मैदानावर फिजियोनी येऊन त्याची विचारपूस केली, त्यानंतर स्ट्रेचरवरून त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले. तसेच तातडीने रुग्णवाहिका बोलावून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरुवातीला तो डॉक्टरांशी बोलत होता. यावेळी पंजाब किंग्सचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनीही मैदानावर धाव घेत त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली.
दिल्ली आणि पंजाब यांच्यातील आयपीएल सामन्यादरम्यान दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले.
दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा एनगिडीने तिसऱ्या षटकात 'मिड-ऑफ'वरून धावत जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न केला. फलंदाज प्रियांश आर्याच्या शॉटवर त्याला चेंडूचा योग्य अंदाज आला नाही आणि संतुलन बिघडल्यामुळे तो जोरात खाली पडला. खाली पडताना त्याच्या डोक्याचा मागचा भाग जमिनीवर जोरात आदळला.
घटनेनंतर लगेचच मैदानावरील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ मदतीसाठी धावले. कुलदीप यादव आणि डेव्हिड मिलर यांच्यासह अनेक खेळाडू चिंतेत दिसले. संघाच्या फिजियोनी तातडीने मैदानात येत एनगिडीवर प्राथमिक उपचार केले.