LSG vs DC | दिल्ली कॅपिटल्सचा लखनौवर दमदार विजय

रिझवीचे नाबाद अर्धशतक; एन्गिडी-नटराजन यांचे प्रत्येकी 3 बळी
LSG vs DC |
LSG vs DC | दिल्ली कॅपिटल्सचा लखनौवर दमदार विजय
Published on
Updated on

लखनौ; वृत्तसंस्था : समीर रिझवीने केलेल्या धडाकेबाज नाबाद अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने ‘आयपीएल’ स्पर्धेत बुधवारी लखनौ सुपर जायंटस्वर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. दिल्लीच्या अष्टपैलू कामगिरीसमोर लखनौचे आव्हान फिके पडले. या लढतीत दिल्लीने लखनौला 18.4 षटकांत सर्वबाद 141 धावांवर रोखल्यानंतर 17.1 षटकांतच 4 गड्यांच्या बदल्यात विजयाचे लक्ष्य गाठले.

रिझवीचा झंझावात

विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली होती. मात्र, चौथ्या षटकात अवघ्या 21 धावांवर दोन गडी बाद झाले असताना समीर रिझवी मैदानात उतरला आणि त्याने 47 चेंडूंत 70 धावांची नाबाद खेळी साकारत विजय खेचून आणला. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 4 उत्तुंग षटकार फटकावले. रिझवीच्या या खेळीमुळे दिल्लीने 142 धावांचे लक्ष्य 17.1 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात 145 धावा करत सहज पूर्ण केले.

लखनौची फलंदाजीत निराशा

तत्पूर्वी, एन्गिडी व टी. नटराजन यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंटस्चा डाव 18.4 षटकांत केवळ 141 धावांमध्येच गुंडाळण्यात यश मिळवले. कुलदीप यादवने देखील 2 बळी घेत यात मोलाचा वाटा उचलला. लखनौतर्फे अब्दुलने समदने सर्वाधिक 36, तर मिशेल मार्शने 35 धावा केल्या. अन्य फलंदाजांनी मात्र सपशेल निराशा केली.

प्रारंभी, मिशेल मार्श वगळता अन्य सर्वच फलंदाजांनी सपशेल निराशा केल्याने लखनौ सुपर जायंटस्च्या धावसंख्येवर बर्‍याच मर्यादा राहिल्या. मार्शने 28 चेंडूंत 2 चौकार, 3 षटकारांसह 35 धावा केल्या. कर्णधार ऋषभ पंतला 7 धावांवर दुर्दैवी रितीने धावबाद व्हावे लागले, तर अनुभवी एडन मार्कराम (11), आयुष बदोनी (0), निकोलस पूरन (6) किरकोळ धावसंख्येवर बाद झाल्याने या संघाला सातत्याने धक्के बसत गेले.

सहाव्या क्रमांकावर फलंदाजीवर उतरणार्‍या अब्दुल समदने सर्वाधिक 36 धावांसह डाव सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, प्रारंभी झालेल्या मोठ्या पडझडीमुळे त्याच्या प्रयत्नांवर बर्‍याच मर्यादा असतील, हे सुस्पष्ट होते. तिसर्‍या षटकातील शेवटच्या चेंडूवर पंत धावचीत झाल्यानंतर लखनौच्या पडझडीला सुरुवात झाली होती.

धावबाद व्हावे लागल्याने पंतची निराशा

मुकेशच्या गोलंदाजीवर मार्शने नॉन स्ट्रायकर एण्डवरील यष्टीच्या रोखाने स्ट्रेट ड्राईव्हचा उत्तम फटका खेळला होता. मात्र, यावेळी चेंडू मुकेशच्या हाताला स्पर्शून यष्टीवर आदळला, त्यावेळी ऋषभ पंत क्रीझपासून बराच दूर होता आणि धावबाद होत त्याला तंबूत परतावे लागले. अशा रीतीने बाद होत परतावे लागल्याने त्याला आपली निराशा लपवता आली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news