

ग्लास्गो (स्कॉटलंड); वृत्तसंस्था : ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या नवव्या दिवशी शुक्रवारी भारताच्या खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांत दमदार कामगिरी करत पदकांच्या आशा अधिक बळकट केल्या. पुरुषांच्या वेटलिफ्टिंग प्रकारात भारताच्या लवप्रीत सिंग याला अवघ्या १ किलोग्रॅमच्या निसटत्या फरकाने त्याचे सुवर्णपदक हुकल्याने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. बाळाच्या जन्मानंतर मैदानात पुनरागमन करणार्या सीमा कालीरमन हिने महिलांच्या थाळीफेकीत ५८.६५ मीटरचा सर्वोत्तम थ्रो करत कांस्यपदक जिंकले. दरम्यान, बॉक्सिंगमध्ये अरुंधती चौधरी, जैस्मिन लांबोरिया, प्रीती पवार आणि अंकुश पंघाल यांनी अंतिम फेरीत प्रवेश करून भारतासाठी किमान रौप्यपदक निश्चित केले. ॲथलेटिक्समध्ये मिश्र ४×४०० मीटर प्रकारात विशाल टी.के., राजेश रमेश, रशदीप कौर आणि नीरू पाठक यांच्या भारतीय रिले संघाने अंतिम फेरीत धडक मारली.
पुरुषांच्या वेटलिफ्टिंग प्रकारात भारताच्या लवप्रीत सिंगचे सुवर्णपदक अवघ्या १ किलोग्रॅमच्या निसटत्या फरकाने हुकले. त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. न्यूझीलंडच्या डेव्हिड लिटीने अंतिम प्रयत्नात राष्ट्रकुल विक्रमी वजन उचलून ऐनवेळी बाजी मारली आणि सुवर्णपदक आपल्या नावावर केले. या गटात स्नॅच फेरीत लवप्रीतने १६८ किलो आणि १७३ किलोचे वजन यशस्वीरीत्या उचलले. त्यानंतर आपल्या तिसऱ्या प्रयत्नात १७६ किलो वजन उचलत राष्ट्रकुल स्पर्धेचा नवीन विक्रम रचला. क्लिन अँड जर्कमध्ये लवप्रीतने फेरीत २०५ किलोने सुरुवात केली आणि दुसऱ्या प्रयत्नात २१२ किलो वजन उचलले. यासह त्याची एकूण बेरीज ३८८ किलो झाली. न्यूझीलंडच्या डेव्हिड लिटीने अंतिम प्रयत्नात क्लिन अँड जर्कमध्ये २२३ किलोचा राष्ट्रकुल विक्रम नोंदवला. यामुळे त्याची एकूण बेरीज ३८९ किलो झाली आणि त्याने लवप्रीतला अवघ्या १ किलोने मागे टाकले.
२७ वर्षीय ॲथलीट सीमा कालीरमन हिने महिलांच्या थाळीफेक प्रकारात ५८.६५ मीटरचा सर्वोत्तम थ्रो करत कांस्यपदक जिंकले. या पदकासह तिने भारताच्या पदकतालिकेत मोलाची भर घातली. या प्रकारात जमैकाच्या समंथा हॉलने ६१.६६ मीटर थ्रोसह सुवर्णपदक, तर कॅनडाच्या ज्युलिया टंक्सने ६०.६७ मीटरसह रौप्यपदक पटकावले. सीमा कालीरमनने अलीकडेच राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत ५९.७३ मीटरचा वैयक्तिक सर्वोत्तम विक्रम नोंदवला होता. विशेष म्हणजे, ती पीएच.डी. पदवीधर असून तीन वर्षांच्या मुलाची आई आहे. बाळाच्या जन्मानंतर मैदानात पुनरागमन करत तिने कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर हे पदक जिंकले. २०२२ मध्ये मुलगा ‘रुद्र’च्या जन्मानंतर सीमाने दोन हंगाम खेळापासून ब्रेक घेतला होता.