पुढारी ऑनलाईन डेस्क : चॅम्पियन्स ट्रॉफीला अवघे काही तास शिल्लक असताना न्यूझीलंड क्रिकेट संघाला आणखी एक धक्का बसला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीला उद्या (दि. १९)पासून प्रारंभ होत आहे. पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे, परंतु या सामन्यापूर्वीच न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे.
दुखापतीमुळे न्यूझीलंड संघातचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी काइल जेमीसन याची संघात वर्णी लागली आहे. याआधीही न्यूझीलंड संघ दुखापतींच्या समस्येशी झुंजत आहे.
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी कराची येथे अफगाणिस्तानविरुद्धच्या अनधिकृत सराव सामन्यात गोलंदाजी केल्यानंतर फर्ग्युसनला उजव्या पायाला दुखापत झाली. प्राथमिक वैद्यकीय तपासणीत असे दिसून आले की तो संपूर्ण स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुरेसा तंदुरुस्त राहणार नाही. फर्ग्युसनला घरी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. फर्ग्युसनची जागा वेगवान गोलंदाज काइल जेमीसन घेईल आणि आज संध्याकाळी तो पाकिस्तानला रवाना होईल. डिसेंबरमध्ये सुपर स्मॅशमध्ये काइल जेमीसनने कॅन्टरबरी किंग्जसाठी स्थानिक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. पाठीच्या दुखापतीमुळे झालेल्या फ्रॅक्चरवर उपचार करण्यासाठी तो १० महिने क्रिकेटपासून दूर होता.
न्यूझीलंड आणि पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या तिरंगी मालिकेदरम्यान, बेन सीयर्सलाही दुखापत झाली होती. त्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला होता. त्याच्या जागी चॅम्पियन्स ट्रॉफी संघात जेकब डफीचा समावेश करण्यात आला. याशिवाय, एकदिवसीय तिरंगी मालिकेत दुखापत झालेली रचिन रवींद्र देखील अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही.
चॅम्पियन ट्रॉफीसाठी न्यूझीलंडचा संघ : मिचेल सँटनर (कर्णधार), केन विल्यमसन, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, विल ओ'रोर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, नाथन स्मिथ, विल यंग, जेकब डफी आणि काइल जेमिसन.