

म्युनिच; वृत्तसंस्था : फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर, अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. आता ही चर्चा त्याच्या जादुई डाव्या पायाच्या अद्भुत किमतीची आहे. विविध आंतरराष्ट्रीय अहवालांनुसार, मेस्सीच्या डाव्या पायाचा तब्बल ७५० दशलक्ष युरो म्हणजेच सुमारे ९०० दशलक्ष डॉलर्सचा विमा काढण्यात आला आहे. भारतीय चलनात ही रक्कम तब्बल ६,९०० ते ७,५०० कोटी रुपयांच्या घरात जाते. क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात कोणत्याही खेळाडूच्या शरीराच्या भागासाठी काढण्यात आलेली ही आजवरची सर्वात मोठी आणि महागडी विमा पॉलिसी आहे.
फुटबॉलच्या बादशहाच्या पायाचा तब्बल ७,५०० कोटी रुपयांचा विमा
जगातील सर्वात महागडी पेंटिंग, लक्झरी जहाजेही पडली मागे
मेस्सीच्या या डाव्या पायाची किंमत जगातील अनेक ऐतिहासिक वास्तू आणि लक्झरी मालमत्तांपेक्षाही कितीतरी पटीने जास्त आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निवासस्थान असलेले ‘व्हाईट हाऊस’ (किंमत सुमारे ४,००० ते ५,००० कोटी रुपये) आणि दुबईचे प्रसिद्ध ‘बुर्ज अल अरब’ (बांधकाम खर्च सुमारे ५,५०० कोटी रुपये) या दोन्ही वास्तू मेस्सीच्या पायाच्या विम्याच्या रक्कमेसमोर फिक्या पडतात. एवढेच नव्हे तर, जगातील सर्वात महागडी पेंटिंग ‘साल्व्हाटोर मुंडी’ (सुमारे ३,८०० कोटी रुपये) आणि जगातील सर्वात महागडी ट्रान्स्फर फी (नेमारची २०१७ मधील सुमारे २,००० कोटी रुपयांची ट्रान्स्फर) यांच्यापेक्षा मेस्सीचा डावा पाय अधिक मौल्यवान ठरतो आहे.
डावा पायच ठरणार अर्जेंटिनाचे सर्वात मोठे शस्त्र?
८ वेळा बॅलन डी'ओर पुरस्कार जिंकणाऱ्या मेस्सीने आपल्या कारकिर्दीत ८०० हून अधिक गोल केले असून, त्यातील बहुतांश गोल याच डाव्या पायाच्या जादूने झाले आहेत. बार्सिलोना, पीएसजी, इंटर मियामी आणि अर्जेंटिनासाठी खेळताना त्याने याच पायाच्या जोरावर ऐतिहासिक विजेतेपदे मिळवून दिली आहेत. आता इतिहास रचण्यासाठी मेस्सीचा हाच ‘लाखो डॉलर्सचा डावा पाय’ अर्जेंटिनाचे सर्वात मोठे शस्त्र ठरणार आहे.