

मकाऊ; वृत्तसंस्था : मकाऊ ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले आहे. भारताचा स्टार शटलर आणि राष्ट्रकुल विजेता लक्ष्य सेन आणि युवा खेळाडू तरुण मन्नेपल्ली यांना पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.
शनिवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या पहिल्या उपांत्य सामन्यात लक्ष्य सेनला इंडोनेशियाच्या अल्वी फरहानकडून मोठा धक्का बसला. फरहानच्या वेगवान आणि अचूक खेळापुढे लक्ष्य पूर्णपणे निष्प्रभ ठरला. अवघ्या 39 मिनिटांत संपलेल्या या सामन्यात फरहानने लक्ष्यचा 16-21, 9-21 असा सरळ गेममध्ये पराभव केला. या संपूर्ण हंगामात लय मिळवण्यासाठी झगडणार्या लक्ष्यला या सामन्यातही सूर गवसला नाही. जागतिक चॅम्पियनशिपच्या उंबरठ्यावर फॉर्ममध्ये परतण्याची त्याची आशा या पराभवाने धुळीस मिळाली आहे.
दुसरीकडे, स्पर्धेत चमकदार कामगिरी करत उपांत्य फेरी गाठलेल्या 21 वर्षीय तरुण मन्नेपल्लीची स्वप्नवत दौडही येथे संपुष्टात आली. त्याचा सामना तीन गेमपर्यंत रंगला, पण अखेरीस त्याला पराभव स्वीकारावा लागला. पहिला गेम 21-19 असा जिंकूनही तरुणला मिळालेल्या आघाडीचा फायदा उठवता आला नाही. प्रतिस्पर्धी खेळाडूने जोरदार पुनरागमन करत पुढील दोन्ही गेम 21-16, 21-16 असे जिंकले. एक तास 21 मिनिटे चाललेल्या या सामन्यात तरुणकडून झालेल्या अनावश्यक चुका त्याला महागात पडल्या. या दोन्ही पराभवांसह स्पर्धेतील भारताचे पुरुष एकेरीतील आव्हान संपले आहे.