घरच्या मैदानावर ‘सीएसके’चे वस्त्रहरण

CSK vs KKR : अवघ्या 61 चेंडूंत ‘केकेआर’ने सामना जिंकला
CSK vs KKR
घरच्या मैदानावर ‘सीएसके’चे वस्त्रहरण
Published on
Updated on

चेन्नई : कर्णधार बदलूनही चेन्नईचे नशीब बदलले नाही. कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने चेपॉकच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला 8 विकेटस्नी एकहाती पराभूत केले. पहिल्यांदा फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जच्या संघातील फलंदाजांनी नांगी टाकल्यामुळे बालेकिल्ल्यात ‘सीएसके’च्या संघाच्या नावे नीच्चांकी धावसंख्येची नोंद झाली. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने स्फोटक फलंदाजी करत सामना खिशात घातला. या पराभवासह चेन्नई सुपर किंग्जच्या संघाच्या 6 व्या सामन्यात पाचवा पराभव पदरी आला. ‘आयपीएल’च्या आतापर्यंतच्या इतिहासात एका हंगामात चेन्नईच्या संघाने कधीच सलग पाच सामने गमावले नव्हते. यंदाच्या हंगामात घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जने सलग तिसरा सामना गमावला आहे.

प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नईला 9 बाद 103 धावाच करता आल्या. याचा पाठलाग करताना क्विंटन डी कॉक आणि सुनील नारायण या जोडीने चार षटकांत 46 धावा चोपून चेन्नईला पूर्णपणे बॅकफूटवर फेकले. चेन्नई त्यांच्या घरच्या मैदानावर खेळतेय असे जाणवलेच नाही. कोलकाताने एकहाती वर्चस्व गाजवले. चेन्नईकडून पदार्पण करणार्‍या अंंशुल कम्बोजने पहिले यश मिळवून दिले. क्विंटन 16 चेंडूंत 3 षटकारांच्या मदतीने 23 धावांवर बाद झाला. नारायण मात्र वेगळ्याच मूडमध्ये होता. त्याने 18 चेंडूंत 2 चौकार व 5 षटकारांसह 44 धावांची वादळी खेळी केली. अखेर नूर अहमदने त्याचा त्रिफळा उडवला. ‘केकेआर’ने 10.1 षटकांत 2 बाद 107 धावा करून विजय मिळवला.

महेंद्रसिंग धोनीचे कर्णधार म्हणून पुनरागमन चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांसाठी सुपरफ्लॉप ठरले. कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांसमोर यजमानांनी नांग्या टाकल्या. संघ अडचणीत असताना एम. एस. धोनी फिरकीपटूंना टाळण्यासाठी 9 व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. परंतु, चार चेंडूंत सुनील नारायणने त्याला फिरकीच्या जाळ्यात अडकवले. त्यामुळे धोनी कर्णधार बनल्याने विजय मिळेल, असा भ्रमाचा फुगा फुटला. चेन्नईचे चाहते प्रचंड निराश दिसले.

अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रचिन रवींद्र (4) हर्षित राणाला विकेट देऊन माघारी परतला. ‘सीएसके’चा माजी खेळाडू मोईन अलीने डेव्हॉन कॉनवेला (12) बाद केले. चेन्नईला पॉवर प्लेमध्ये 2 बाद 31 धावा करता आल्या आणि यंदाच्या ‘आयपीएल’मधील ही त्यांची पॉवर प्लेमधील दुसरी खराब कामगिरी ठरली. खेळपट्टी फिरकीला साथ देत होती, त्यामुळे ‘सीएसके’चा संघ पूर्णपणे दडपणाखाली गेला. राहुल त्रिपाठी व विजय शंकर यांना मोठी खेळी करण्याची संधी होती. कोलकाताच्या खेळाडूंनी विजयचे दोन सोपे झेल टाकले. तरीही विजय 29 धावांवर वरुण चक्रवर्थीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्रिपाठीचा (16) त्रिफळा उडवून नारायणने 65 धावांवर चौथा धक्का दिला.

फलंदाजीला धोनी येणे अपेक्षित होते. परंतु, आर. अश्विनला वरच्या क्रमांकावर पाठवले गेले. तो हर्षित राणाच्या गोलंदाजीवर 1 धावेवर बाद झाला. त्यानंतर जड्डू व दीपक हुडा हे भोपळ्यावर अनुक्रमे नारायण व वरुण यांच्या गोलंदाजीवर बाद झाले. धोनी आला तेव्हा स्टेडियमवर कल्ला झाला. परंतु, तो 4 चेंडूंचा पाहुणा राहिला. नारायणने त्याला पायचीत पकडून एक धावेवर माघारी पाठवले अन् स्मशान शांतता पसरली. 2013 मध्ये चेन्नईचा संघ मुंबई इंडियन्सविरुद्ध 79 धावांत तंबूत परतला होता आणि शुक्रवारी ते संकट त्यांनी टोलवून लावले, हिच त्यांच्यासाठी समाधानाची गोष्ट म्हणता येईल. चेन्नईचे फलंदाज गोंधळलेल्या अवस्थेत दिसले. नारायणने 4-0-13-3 असा स्पेल टाकला. वरुण चक्रवर्थी व हर्षित राणा यांनीही प्रत्येकी दोन विकेटस् घेतल्या. शिवम दुबे मैदानावर असूनही तो गोलंदाजांना स्ट्राईक देत होता. दुबेने शेवटपर्यंत फलंदाजी करताना संघाला 9 बाद 103 धावांपर्यंत पोहोचवले. दुबे 31 धावांवर नाबाद राहिला.

चेन्नईतील ‘आयपीएल’मधील सर्वात कमी धावसंख्या

70/10 - आरसीबी विरुद्ध सीएसके, 2019

95/9 - पंजाब किंग्ज विरुद्ध सीएसके, 2015

99/10 - दिल्ली विरुद्ध सीएसके, 2019

101/10 -लखनौविरुद्ध मुंबई इंडियन्स, 2023

102/10 - सीएसके विरुद्ध केकेआर, 2025

संक्षिप्त धावफलक

चेन्नई सुपर किंग्ज : 9 बाद 103 धावा. (शिवम दुबे 31, विजय शंकर 29. सुनील नारायण 3/13)

कोलकाता नाईट रायडर्स : 10.1 षटकांत 2 बाद 107 धावा. (सुनील नारायण 44, क्विंटन डि कॉक 23. नूर अहमद 1/8)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news