

कोलकाता : इंडियन प्रीमियर लीग 2025 स्पर्धेच्या 15 व्या सामन्यात गुरुवारी (3 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादला 80 धावांनी पराभूत केले. कोलकातामधील ईडन गार्डन्सवर हा सामना पार पडला. कोलकाताने हा सामना जिंकत यंदाच्या हंगामातील दुसर्या विजयाची नोंद केली. मात्र, सनरायझर्स हैदराबादचा सलग तिसर्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या सामन्यात कोलकाताने हैदराबादसमोर 201 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादचा संघ 16.4 षटकांत 120 धावांवर सर्वबाद झाला.
कोलकाता नाईट रायडर्सने द्विशतकी आव्हान उभे केले असताना सनरायझर्स हैदराबादचे आघाडीचे तीन आक्रमणवीर ट्रॅव्हिस हेड (4), अभिषेक शर्मा (2) आणि इशान किशन (2) हे 9 धावांत तंबूत परतल्याने त्यांच्या प्रतिकाराची हवा निघून गेली होती. नितीशकुमार रेड्डी आणि कामिंदू मेंडिस यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण रसेलने नितीशला बाद करून ही जोडी तोडली. त्यानंतर मेंडिस आणि हेन्रिक क्लासेन यांनी थोडा प्रतिकार केला. मेंडिस 27 धावांवर बाद झाला. क्लासेनची एकतर्फी लढाई वैभव अरोराने 33 धावांवर संपुष्टात आणली. 15 व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर वरुण चक्रवर्तीने पॅट कमिन्स (14) आणि सिमरजीत सिंग यांना बाद करत हैदराबादला दोन धक्के दिले. शेवटी 17 व्या षटकात हर्षल पटेल 3 धावांवर बाद झाला आणि हैदराबादचा डाव संपला. कोलकाताकडून गोलंदाजी करताना वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 3 विकेटस् घेतल्या.
तत्पूर्वी, या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाताचा क्विंटन डी कॉक दुसर्याच षटकात कमिन्सने झीशन अन्सारीच्या हातून 1 धावेवर बाद केले. त्यापाठोपाठ पुढच्याच षटकात मोहम्मद शमीने सुनील नरेनचा अडथळा दूर केला, पण नंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अंगक्रिश रघुवंशी यांनी डाव सावरला. ही भागीदारी धोकादायक ठरत असतानाच रहाणेला झीशन अन्सारीने बाद केले. रहाणेने 38 धावांची खेळी केली. नंतर रघुवंशीने अर्धशतक पूर्ण केले. पण त्याला अर्धशतकानंतर कामिंडू मेंडिसने बाद केले. त्याने 50 धावांची खेळी केली. शेवटी वेंकटेश अय्यर आणि रिंकू सिंग यांनी वादळी खेळ केला आणि संघाची धावसंख्या वाढवण्यात मोलाचा वाटा उचलला. वेंकटेशने 19 व्या षटकात पॅट कमिन्सविरुद्ध 4, 6,4,4, 2,1 अशा धावा चोपल्या. यासह त्याने अर्धशतकही पूर्ण केले होते. त्याने 29 चेंडूंत 7 चौकार आणि 3 षटकारांसह 60 धावा केल्या. त्यामुळे कोलकाताने 20 षटकांत 6 बाद 200 धावा केल्या.
सनरायझर्स हैदराबाद : 20 षटकांत 6 बाद 200 धावा. (वेंकटेश अय्यर 60, अंगक्रीश रघुवंशी 50. मो. शमी 1/29.)
कोलकाता नाईट रायडर्स : 16.4 षटकांत सर्वबाद 120 धावा. (हेन्रिक क्लासेन 33, कामिंदू मेंडिस 27. वरुण चक्रवर्ती 3/22, वैभव अरोरा 3/29)