वस्ताद, पैलवानांचा नुरा कुस्तीविरोधात एल्गार

'महाराष्ट्र केसरी'साठी होणार डोपिंग चाचणी
Vastad, Pailwan Round Table Conference
खासबाग केसरी कुस्ती मैदान समितीने वस्ताद, पैलवान गोलमेज परिषदेचे आयोजन केले होतेfile photo

कोनवडे : महाराष्ट्रातील वस्ताद, पैलवान गोलमेज परिषदेत खासबाग मैदानातील पवित्र लाल माती हातात घेऊन नुरा कुस्ती विरोधात एल्गार पुकारण्यात आला. या वर्षीच्या या 'महाराष्ट्र केसरी'साठी सुवर्ण पदकापासून कांस्य पदकापर्यंत पोहोचणाऱ्या मल्लांची डोपिंग चाचणी करण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र कुस्तीगीर संघ कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी केली.

कोनवडे (ता. भुदरगड) येथे खासबाग केसरी कुस्ती मैदान समितीने येथील राजर्षी शाहू प्रबोधनी येथे वस्ताद, पैलवान गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी संपूर्ण राज्यातील वस्ताद, पैलवान, निवेदक, कुस्तीशौकिन मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी 'हिंदकेसरी' दीनानाथ सिंह होते. कार्यक्रमाचे स्वागत पैलवान संग्राम कांबळे यांनी केले. या परिषदेत कुस्ती वाचवण्यासाठी कुस्ती क्षेत्राशी सर्व घटकांशी संबंधित काही ठराव करण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष व खासदार मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय राज्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी करण्यात आला. महाराष्ट्र कुस्तीगीर संघ कार्याध्यक्ष संदीप भोंडवे म्हणाले, या वर्षीच्या या 'महाराष्ट्र केसरी'साठी डोपिंग चाचणी अनिवार्य असून, त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

कुस्ती जिवंत ठेवण्यासाठी संघटनांनी एकत्र यावे

दीपाली सय्यद म्हणाल्या, कुस्ती जिवंत ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील संघटनांनी एकत्र येणे गरजेचे आहे. यावर्षी कुस्ती पंढरी कोल्हापूरमध्ये पाहिले महिला महाराष्ट्र कुस्ती मैदान आयोजित केले होते; पण प्रेक्षकांची खुपच कमतरता होती, ही शोकांतिका आहे. या कार्यक्रमास खाशाबा जाधवांचे सुपुत्र रणजित जाधव, मुख्यमंत्री कक्षप्रमुख मंगेश चिवटे, मल्लसम्राट अस्लम काझी, 'महाराष्ट्र केसरी' विष्णू जोशिलकर, मेघराज कटके, सोनबा गोंगाणे, संग्राम पाटील, बट्ट जाधव, राजेंद्र गुरव, संतोष वेताळ, आनंदा धुमाळ यांच्यासह वस्ताद आणि पैलवान उपस्थित होते.

दै. 'पुढारी'चे कौतुक

नुरा कुस्ती, डोपिंग यासह या खेळातील अपप्रवृत्ती विरोधात सातत्याने आवाज उठवत राज्यातील कुस्ती क्षेत्राला जागृत केल्याबद्दल मान्यवरांनी दै. 'पुढारी'चे कौतुक केले. यापुढे कुस्तीबद्दल सातत्याने लिहून कुस्तीमध्ये ऊर्जितावस्था आणावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

खासबाग मैदानासाठी ५ कोटी निधी मंजूर...

महायुती सरकारच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांत कुस्तीला ऊर्जितावस्था देण्याचे काम केले आहे. पैलवानांना आरोग्याच्या बाबतीत भेडसावणारी सर्वात महत्त्वाची समस्या लीगामेंट शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहाय्य निधीतून आतापर्यंत १२५ पैलवानांनी लाभ घेतला आहे. कुस्तीची पंढरी असणाऱ्या कोल्हापूर येथील खासबाग मैदानासाठी ५ कोटी निधी मंजूर केला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यकक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news