

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाज सोनम उत्तम मस्कर हिने आपल्या कौशल्याच्या जोरावर जपानमध्ये होणाऱ्या २० व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवले आहे. एका सामान्य कुटुंबातून येत आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेणाऱ्या सोनमच्या या यशामागे तिच्या वडिलांचा मोठा त्याग आणि संघर्ष दडला आहे.
नेमबाजीसाठी आवश्यक असलेले महागडे साहित्य खरेदी करण्यासाठी तिच्या वडिलांनी आपली जमीन विकल्याचा भावुक खुलासा सोनमने केला आहे. २३ वर्षीय सोनम जपानमधील आयची-नागोया येथे १७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या आशियाई स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. सोनम मूळची गारगोटी येथील आहे.
मुंबईच्या तोलानी कॉमर्स कॉलेजमध्ये शिकत असताना २०१८ मध्ये तिने सहज म्हणून नेमबाजी सुरू केली होती. मात्र, लॉकडाऊनच्या काळात तिच्या कुटुंबाला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. नेमबाजीत पुढे जाण्यासाठी स्वतःची रायफल आणि इतर साहित्याची अत्यंत गरज होती. त्यावेळी तिच्या वडिलांनी कोणताही विचार न करता जमीन विकण्याचा मोठा निर्णय घेतला आणि सोनमच्या महत्त्वाकांक्षेला पंख दिले.Biogas Vehicles
विश्वचषकातील कामगिरी आणि आशियाई स्पर्धेची तयारी
२०२१ पासून कोल्हापूरच्या शूटिंग रेंजवर सराव सुरू केल्यानंतर सोनमने मागे वळून पाहिले नाही. २०२४ मध्ये कैरो येथील विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक आणि नवी दिल्लीतील आयएसएसएफ विश्वचषक फायनलमध्ये रौप्यपदक जिंकून तिने देशाचे नाव उज्ज्वल केले. या कामगिरीमुळे तिला रेल्वेमध्ये नोकरीची संधीही मिळाली. सध्या ती विदेशी प्रशिक्षक फर्निक थॉमस आणि भारतीय प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आशियाई स्पर्धेसाठी कसून सराव करत आहे. आपल्या या प्रवासात कुटुंब, क्रीडा प्राधिकरण, ओजीक्यू आणि राष्ट्रीय रायफल असोसिएशनने दिलेल्या पाठिंब्याबद्दल तिने कृतज्ञता व्यक्त केली आहे. कोल्हापुरात तिने शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या प्रशिक्षक राधिका बराले-हवालदार, रोहित हवालदार यांच्या मार्गदर्शनाखाली वेध शूटिंग अकादमीतही सराव केला आहे.