

म्हाकवे, पुढारी वृत्तसेवा : उत्तराखंड येथे सुरू असलेल्या नॅशनल गेम्स ग्रीकोरोमन कुस्ती स्पर्धेत ६८ किलो वजन गटात कोल्हापूरचा पैलवान विनायक सिद्धेश्वर पाटील याने सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धा चार वर्षातून एकदा होतात.पहिल्या फेरीत विनायक ने गुजरातच्या मल्ल विशाल यादव याला चितपट करून विजय मिळवला. दुसऱ्या फेरीत मध्य प्रदेशचा पैलवान सनी जाधव याच्यावर दहा शुन्य गुणांनी विजय संपादन करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
उपांत्य फेरीत विनायकने दिल्लीचा मल्ल अनिकेत याच्यावर दहा विरूद्ध पाच गुणांनी विजय पटकावत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीमध्ये हरियाणाचा मल्ल अनिल याला चितपट करून नॅशनल गेम्स स्पर्धेत तो सुवर्णपदाचा मानकरी ठरला. पैलवान विनायक पाटील याला आर्मी सेंटर पुणेचे कोच श्री दळवी उपमहाराष्ट्र केसरी रविंद्र पाटील, जय भवानी तालमीचे वस्ताद तुकाराम चोपडे यांचे मार्गदर्शन लाभले.
उपांत्यफेरीत पैलवान विनायक याला डोक्याला गंभीर दुखापत होऊनसुद्धा त्यांने कुस्ती करून उपांत्य व अंतिम फेरी विजय संपादन करत सुवर्णपदक जिंकले. याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.