.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
कोल्हापूर | Khashaba Jadhav : पैलवान खाशाबा जाधव हे एक-दोन नव्हे, तर तीन ऑलिम्पिक खेळण्यासाठी भारताकडून सज्ज झाले होते. सन 1952 साली हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले वैयक्तिक पदक खाशाबा जाधव यांनी मिळवून दिले हे सर्वांना माहीत आहे; परंतु त्यापूर्वी सन 1948 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भाग घेत सहाव्या क्रमांकापर्यंत धडक दिली होती. तसेच ते पत्री सरकारमध्येही सक्रिय होते. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून 76 वर्षांपूर्वी गोळेश्वर येथे त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला होता. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा सत्कार झाल्यानंतर बैलगाडीतून पै. खाशाबा यांची भव्य मिरवणूकही काढण्यात आली होती. सुमारे 76 वर्षांपूर्वी गोळेश्वर येथे झालेल्या या सत्कार समारंभाची माहिती देणारी पत्रिका सध्या सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.
पै. खाशाबा जाधव यांनी कुस्ती क्षेत्रात केलेल्या आंतरराष्ट्रीय कामगिरीचा सन्मान म्हणून विशेष सत्कार सोहळा सध्याच्या सातारा जिल्ह्यातील गोळेश्वर येथे गुरुवार, दि. 23 सप्टेंबर 1948 रोजी दुपारी 3 वाजता झाला होता. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमास क्रांतिअग्रणी जी. डी. लाड (कुंडल), आप्पा पाटील (साकराळकर), वस्ताद चौकीत्राले, केशवराव पवार आदी उपस्थित होते. सत्कारानंतर 51 बैलगाड्यांसह पै. खाशाबा जाधव यांची भव्य मिरवणूकही काढण्यात आली होती. पानसुपारी व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यानिमित्ताने रात्री 9 ते 11 या वेळत शाहीर शंकर कुंडलकर यांच्या पोवाड्याचा कार्यक्रमही झाला होता. कार्यक्रमाचे संयोजन रामचंद्र लक्ष्मण जाधव, दादू कृष्णा जाधव, ज्ञानू आकाराम जाधव, खाशा बाळा जाधव, खाशा विठू जाधव, पांडू बाळकू जाधव आणि श्रीदत्त प्रेस, कराड यांच्या वतीने करण्यात आले होते.
सन 1948 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सहाव्या क्रमांकापर्यंत मजल मारल्यानंतर, सन 1952 साली हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले वैयक्तिक पदक मिळवून देण्याची कामगिरी पै. खाशाबा जाधव यांनी केली. कुस्ती स्पर्धेत 52 किलो वजन गटात फ्री स्टाईलमध्ये कांस्यपदकाची कमाई करून त्यांनी क्रीडा क्षेत्रात इतिहास घडविला होता. यानंतरच्या 1956 च्या ऑलिम्पिकलाही खाशाबा खेळणार होते. मात्र, त्यांच्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्यांना खेळता न आल्याची माहिती त्यांचे चिरंजीव रणजित जाधव यांनी दिली. खाशाबांच्या कुस्ती क्षेत्रातील या कामगिरीबद्दल त्यांना ‘पद्म’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच सन 2000 साली त्यांना ‘मरणोत्तर अर्जुन पुरस्कार’ बहाल करण्यात आला.