

योकोहामा-जपान : दोन वेळा आशियाई विजेती ठरलेली जोशना चिनप्पा हिने सोमवारी योकोहामा येथे आयोजित जपान ओपन स्क्वॅश स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले.
जागतिक क्रमवारीत 117 व्या स्थानावर असलेल्या आणि स्पर्धेत बिगरमानांकित असलेल्या 39 वर्षीय जोशनाने अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत 53 व्या स्थानावर असलेल्या इजिप्तच्या हाया अलीला 11-5, 11-9, 6-11, 11-8 अशा फरकाने पराभूत करून पीएसए चॅलेंजर स्पर्धेतील जेतेपदावर आपली मोहोर उमटवली. हाया अलीविरुद्ध चिनप्पाची ही दुसरी लढत होती. यापूर्वी याच वर्षी बर्मुडा येथील दुसर्या फेरीत त्यांचा सामना झाला होता. यात भारतीय खेळाडूला 11-8, 10-12, 5-11, 11-9, 11-8 असा पराभव पत्करावा लागला होता. माजी जागतिक क्रमवारीत 10 व्या स्थानावर असलेली चिनप्पा, 2023 हँग्झू आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर गुडघ्याच्या शस्त्रक्रियेतून सावरल्यानंतर दमदार फॉर्ममध्ये आहे. त्या स्पर्धेत भारताला कांस्यपदक मिळवून देण्यात तिचा महत्त्वाचा वाटा होता.