Javelin thrower Sachin Yadav | जागतिक स्पर्धेतील पदक हुकल्याची खंत

भालाफेकपटू सचिन यादवने व्यक्त केली भावना; विश्व अ‍ॅथलेटिक्समध्ये चौथ्या क्रमांकापर्यंत धडक
Javelin thrower Sachin Yadav
Javelin thrower Sachin Yadav | जागतिक स्पर्धेतील पदक हुकल्याची खंतPudhari File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : पदार्पणाच्याच जागतिक स्पर्धेत नीरज चोप्रा आणि ज्युलियन वेबरसारख्या दिग्गजांना मागे टाकणे ही नक्कीच चांगली कामगिरी आहे, पण मजबूत सुरुवातीनंतर अनपेक्षित कांस्यपदक हातातून निसटल्याची खंत वाटते, अशी भावना भारताचा नवा भालाफेकपटू सचिन यादवने व्यक्त केली आहे.

दुसर्‍याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेणार्‍या सचिन यादवने टोकिओमध्ये विश्व अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत गुरुवारी दोन वेळचा ऑलिम्पिकपदक विजेता नीरज चोप्रा (84.03 मी.), ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम (82.75 मी.) आणि डायमंड लीग विजेता ज्युलियन वेबर (86.11 मी.) सारख्या प्रसिद्ध खेळाडूंना मागे टाकून एक आश्चर्यकारक आणि दमदार कामगिरी केली. सचिन यादवने पहिल्याच प्रयत्नात 86.27 मीटरचा थ्रो करून आपला वैयक्तिक सर्वोत्तम विक्रम नोंदवला. हा त्याचा मे महिन्यात आशियाई चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकताना केलेल्या 85.16 मीटरच्या थ्रोपेक्षा चांगला होता. अमेरिकेच्या कर्टिस थॉम्पसनने 86.67 मीटरच्या थ्रोसह कांस्यपदक जिंकले, जे यादवच्या प्रयत्नापेक्षा फक्त 40 सेंटिमीटर जास्त होते.

पीटीआयशी बोलताना सचिन यादव म्हणाला, पहिला थ्रो खूप चांगला झाला. हवामान चांगले होते, माझे शरीर चांगल्या स्थितीत होते आणि कामगिरी जवळजवळ परिपूर्ण होती. ज्या क्षणी मी माझा भाला जमिनीवर पडताना पाहिला, मला वाटले की मी पदक जिंकू शकेन. मला खात्री होती की मी किमान एक थ्रो 87 मीटरचा करू शकेन. मी जगातील सर्वोत्तम खेळाडूंशी स्पर्धा करत होतो आणि अशा वेळी साहजिकच तुमची कामगिरी चांगली होते, पण मी खूप प्रयत्न करूनही पुढील पाच प्रयत्नांमध्ये माझा पहिला थ्रो सुधारू शकलो नाही. त्यामुळे, मला वाटते की माझ्या हातून जागतिक स्पर्धेतील पदक निसटले, अशी खंत 25 वर्षीय सचिनने व्यक्त केली.

नीरजभाईसाठी वाईट वाटते

उत्तर प्रदेशातील बागपतजवळील खेकडा गावातील शेतकरी कुटुंबातून आलेल्या सचिन यादवला दुखापतीमुळे खराब कामगिरी करणार्‍या नीरज चोप्राबद्दलही वाईट वाटले. चोप्रा पाठीच्या दुखण्यामुळे पाचव्या फेरीनंतर स्पर्धेतून बाहेर पडला होता. मी आणि नीरजभाई अंतिम सामन्यात सतत बोलत होतो. त्याच वेळी मला नीरजभाईसाठी वाईट वाटत होते. (2021 मध्ये टोकिओ ऑलिम्पिकनंतर) तो पहिल्यांदाच पोडियमवर नव्हता. कोणत्याही परिस्थितीत, आपल्या देशाला पदक मिळणार होते. पण ते झाले नाही, त्यामुळे मला वाईट वाटले, असे सचिन यादवने सांगितले.

यादवच्या गावातील घराचे पहिल्यांदाच फोटो काढले

सचिन यादवने सांगितले की, त्याच्या पालकांना अ‍ॅथलेटिक्सबद्दल फारशी माहिती नाही आणि जागतिक स्पर्धेबद्दल तर नाहीच. टोकिओमधील त्याच्या कामगिरीनंतर त्यांच्या घरी पत्रकार आल्याचे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. मी माझ्या आईशी बोललो आहे. माझे आई-वडील आनंदी आहेत, पण त्यांना या सगळ्याबद्दल, जागतिक स्पर्धा आणि पदके जिंकण्याबद्दल फारसे काही माहीत नाही. त्यांना फक्त मला सरकारी नोकरी मिळावी, असे वाटत होते. त्यांनी कधीही माध्यमांना पाहिले नव्हते. त्यामुळे पहिल्यांदाच असे झाले की माध्यमे माझ्या घरी गेली आणि त्यांनी फोटो काढले. माझ्या आईने मला सांगितले की, काही लोक आमच्या घरी आले आणि त्यांनी फोटो काढले.

उत्तर प्रदेश पोलिस दलात सेवेत

सचिन यादव आता उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये आहे, त्याने 2023 मध्ये क्रीडा कोट्यातून पोलिस दलात प्रवेश केला. त्याच्या करिअरच्या सुरुवातीला 2021 मध्ये जेव्हा त्याला कोपराला दुखापत झाली, तेव्हा त्याच्या वडिलांना त्याच्या उपचारासाठी कर्ज घ्यावे लागले होते.

क्रिकेटपटूचा झाला भालाफेकपटू

गावातील मित्र संदीप यादवने सचिन यादवला भालाफेकीशी ओळख करून दिली. एक दिवस तो क्रिकेट खेळत असताना संदीपने त्याला चांगली गोलंदाजी करताना पाहिले. गेल्या वर्षीच त्याने यादवला प्रसिद्ध प्रशिक्षक नवल सिंह यांच्याकडे पाठवले, ज्यांनी ऑलिम्पियन शिवपाल सिंह आणि पॅरालिम्पिक सुवर्ण विजेते सुमित अंतिल आणि नवदीप सिंह यांना प्रशिक्षण दिले आहे.

मी अधिक ताकदीने परत येईन : नीरज

जागतिक चॅम्पियनशिपमध्ये आठव्या स्थानावर येणे हा माझ्यासाठी निराशाजनक शेवट होता. मात्र, ब्रेकनंतर तो अधिक ताकदीने परत येईल, असा निर्धार भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने शुक्रवारी व्यक्त केला. पाठीच्या दुखण्यामुळे त्रस्त असलेल्या चोप्राला गुरुवारी टोकिओमध्ये झालेल्या विश्व अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भालाफेकीतील अंतिम सामन्यात केवळ 84.03 मीटरचा सर्वोत्तम थ्रो करता आला आणि तो पाचव्या फेरीनंतर स्पर्धेतून बाहेर पडला. शुक्रवारी केलेल्या ट्विटमध्ये नीरज चोप्रा याने म्हटले आहे की, टोकिओमध्ये जागतिक चॅम्पियनशिपमध्ये या मोसमाचा शेवट मी अपेक्षेप्रमाणे करू शकलो नाही. सर्व आव्हानांवर मात करून भारतासाठी माझे सर्वोत्तम द्यायचे होते, पण ती माझी रात्र नव्हती. मात्र, सचिन यादवसाठी मी खूप आनंदी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news