

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्न येथे खेळला जात आहे. या बॉक्सिंग डे कसोटीच्या शेवटच्या दिवशी भारतासमोर 340 धावांचे लक्ष्य आहे. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 234 धावांवर संपला. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने नॅथन लायनला क्लीन बोल्ड करत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव संपवला. या विकेटसह बुमराहने कसोटीत 13व्यांदा एका डावात पाच विकेट्स घेतल्याची कामगिरी केली आहे. मेलबर्नमधील बॉक्सिंग डे कसोटीत त्याने पुन्हा एकदा कहर केला आहे. या मैदानावरील त्याची आकडेवारी उत्कृष्ट आहे. त्याच वेळी, बुमराह यावर्षी कसोटीतील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.
लियॉन (41) व्यतिरिक्त बुमराहने सॅम कॉन्स्टास (8), ट्रॅव्हिस हेड (1), मिचेल मार्श (0) आणि ॲलेक्स कॅरी (2) यांना ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात बाद केले. पहिल्या डावात बुमराहने 28.4 षटकांत 99 धावा देऊन चार विकेट घेतल्या, तर दुसऱ्या डावात 24.4 षटके टाकून 57 धावांत 5 बळी घेतले. बुमराहने या कसोटीत 200 बळीही पूर्ण केले होते. सध्या त्याच्या नावावर 44 कसोटीत 203 विकेट्स आहेत. या काळात त्याची गोलंदाजीची सरासरी 19.43 आणि स्ट्राईक रेट 42.22 इतका आहे. 27 धावांत 6 बळी ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. तसेच बुमराह हा भारताकडून कसोटीत 200 विकेट्स पूर्ण करणारा दुसरा वेगवान गोलंदाज आहे. त्याच्या पुढे रविचंद्रन अश्विन आहे, ज्याने 37 कसोटीत हे स्थान गाठले होते.
मेलबर्नमधील बॉक्सिंग डे कसोटीत बुमराहची आकडेवारी उत्कृष्ट ठरली आहे. आतापर्यंत MCG मधील बॉक्सिंग डे कसोटीत त्याने तीन सामन्यांमध्ये 14.66 च्या सरासरीने आणि 32.7 च्या स्ट्राइक रेटने 24 बळी घेतले आहेत. 33 धावांत 6 बळी ही त्याची कसोटीतील सर्वोत्तम गोलंदाजी आहे, जी त्याने या मैदानावरील पहिल्या बॉक्सिंग डे कसोटीत मिळवली. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये मेलबर्नमधील बॉक्सिंग डे कसोटीत भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाजही तो आहे. बुमराहनंतर अनिल कुंबळे येतो. कुंबळेने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे टेस्टमध्ये 15 विकेट घेतल्या होत्या.
या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये बुमराहने 13 कसोटींमध्ये 14.92 च्या सरासरीने आणि 30.1 च्या स्ट्राईक रेटने 71 विकेट घेतल्या. या काळात त्याचा इकॉनॉमी रेट 2.96 राहिला आहे. यावर्षी कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा तो गोलंदाज आहे. त्याच्या आजूबाजूला कोणी नाही. इंग्लंडचा गस ऍटकिन्सन 52 विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा शोएब बशीर 49 विकेट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यंत, कसोटी क्रिकेटमध्ये असे 107 वेळा घडले आहे जेव्हा एका कॅलेंडर वर्षात गोलंदाजाने 50+ विकेट घेतल्या आहेत. यामध्ये बुमराहची सरासरी सर्वोत्कृष्ट आणि स्ट्राइक रेट दुसऱ्या क्रमांकावर आहे.