

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगप्रसिद्ध हेवीवेट चॅम्पियन बॉक्सर माइक टायसन याला पराभवाला सामोरे (Mike Tyson vs Jake Paul) जावे लागले आहे. त्याला युट्यूबर ते बॉक्सर बनलेल्या २७ वर्षीय जेक पॉलने डल्लास, टेक्सास येथील ब्लॉकबस्टर नेटफ्लिक्स इव्हेंटच्या (Netflix event) मुख्य इव्हेंटमध्ये पराभवाचा धक्का दिला. माइक टायसन १९ वर्षानंतर बॉक्सिंग रिंगमध्ये उतरला होता. माइक टायसन हा बॉक्सिंग रिंगमध्ये आक्रमक खेळ, आक्रोश आणि त्याच्या वेडेपणासाठी नेहमी चर्चेत राहिला आहे.
पॉलने पहिल्या २ फेरीत मागे पडल्यानंतर जोरदार कमबॅक केले. ही लढत ८ राउंडपर्यंत चालली. नेटफ्लिक्सवर थेट प्रक्षेपित झालेल्या आठ फेरीच्या या लढतीत टायसनपेक्षा ३० वर्षांनी लहान असलेल्या पॉलने ८०-७२, ७९-७३ आणि ७९-७३ अशा गुणांसह हेवीवेट लढत जिंकली.
५८ वर्षीय टायसनला लढतीदरम्यान खूप संघर्ष करावा लागला. माइक टायसनने १६ मिनिटे चाललेल्या लढतीत केवळ १८ अचूक पंच मारले. तर दुसरीकडे जेक पॉलने टायसनपेक्षा चार पट जास्त ७८ अचूक पंच मारले.
टायसन १९ वर्षांच्या विश्रांतीनंतर रिंगमध्ये उतरला. तर पॉलच्या नावावर १०-१ असा लढतीचा विक्रम आहे. या हेवीवेट लढतीपूर्वी तणाव निर्माण झाला होता. कारण टायसनने वेट-इन दरम्यान पॉलला थप्पड मारली होती. त्याने आपण हरणार नाही असा दावाही केला होता.
टायसनने फ्रंट फूटवर खेळण्यास सुरुवात केली आणि त्याने सुरुवातीला पॉलला काही पंच मारले. पहिल्या राउंडमध्ये टायसनने वर्चस्व राखत १०-९ असे गुण मिळवले. दुसऱ्या राउंडमध्येही त्याने गती पकडली. त्याने हा राउंड १०-९ असा जिंकला. पण त्यानंतर तिसऱ्या फेरीत पॉलने जोरदार कमबॅक केले. पॉलने अनेक पंच मारत टायसनला हादरवून सोडले. पॉलने हा राउंड १०-९ ने जिंकला. तरीही सामना चौथ्या राउंडपर्यंत जाईपर्यंत टायसनन २९-२८ गुणांसह आघाडीवर होता. चौथ्या राउंडमध्ये टायसन काहीसा थकलेला दिसून आला. याचा पॉलने फायदा उचलला आणि पुढील राउंडवर वर्चस्व राखले.