दक्षिण आफ्रिकेचे शेर पुन्हा 'ढेर'! आर्यलंडचा ऐतिहासिक विजय
पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेटमधील दिग्गज संघ अशी ओळख असणार्या दक्षिण आफ्रिका संघाचा अफगाणिस्तान पाठोपाठ आता आर्यलंडनेही पराभव केला आहे. ( Ireland vs South Africa ) सामन्यात आर्यलंडच्या अडायर बंधूंची ( ross adair ) खेळी महत्त्वपूर्ण ठरली. आयर्लंडचा हा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला T20 विजय ठरला आहे. या कामगिरीमुळे तीन सामन्यांच्या मालिकेत आर्यलंडने 1-1 अशी बरोबरीही साधली आहे.
रॉस अडायरचे झंझावती शतक
दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आयर्लंडने २० षटकांत ६ गडी गमावत १९५ धावा केल्या. रॉस अडायरने ५७ चेंडूत ९ षटकार फटकावत झंझावती शतक झळकावले. कर्णधार पॉल स्टर्लिंगने ३१ चेंडूत ५२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. या दोघांनी तब्बल १३७ धावांची सलामीची भागीदारी केली.
दक्षिण आफ्रिकेला १९६ धावांचे लक्ष्य
आर्यलंडने आपल्या डावाच्या अखेरच्या षटकात ४३ धावांमध्ये ६ गडी गमावले. मात्र तत्पूर्वी रॉस अडायरचे झुंझार शतक आणि कर्णधार पॉल स्टर्लिंगच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर आर्यलंडने दक्षिण आफ्रिकेला १९६ धावांचे कठीण लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने चांगली सुरुवात केली, जिथे रीझा हेंड्रिक्सने सलग दुसरे अर्धशतक (५१ धावा) झळकावले. मॅथ्यू ब्रेट्झकेनेही ५१ धावांची खेळी केली. सलामीवीर रायन रिकेल्टनने 22 चेंडूत 36 धावा फटकावल्या.
मार्क अडायरच्या षटकाने सामन्याचा निकालच बदलला
सामन्यालतील शेटवच्या दोन षटकांमध्ये दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २३ धावा हव्या होत्या. मात्र मार्क अडायरच्या 19व्या षटकाने सामन्याचा निकालच बदलला. त्याने लागोपाठ दोन चेंडूत विआन मुल्डर आणि ब्रेत्झके यांना तंबूत धाडले. यानंतर ॲन पीटर्सलाही बाद केले. केवळ पाच धावांत तीन बळी घेत सामन्याचा निकालच बदलला. ग्रॅहम ह्यूमनेही शेवटच्या षटकात दमदार गोलंदाजी केली, ज्यात त्याने फक्त ७ धावा देत एक विकेट घेतली. त्याने चार षटकांत 25 धावा देत 3 बळी घेतले. दक्षिण आफ्रिकेला डाव 20 षटकांत १८५ धावांपर्यंत मजल मारता आली.
टी-20 मालिकेत बरोबरी
आयर्लंडसाठी हा एक महत्त्वपूर्ण विजय ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या संघाचा हा दुसरा आंतरराष्ट्रीय विजय आहे. यापूर्वी 2021 मध्ये वनडे सामन्यात विजय मिळवला होता. आता टी-20 मालिका बरोबरी साधल्याने बुधवारपासून अबुधाबी येथे सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेवर दोन्ही संघांचे लक्ष असेल.
