IPL Playoff Scenario : प्ले-ऑफच्या शर्यतीत टिकण्यासाठी पंजाबची लखनौविरुद्ध ‌‘करो या मरो‌’ची लढाई

पंजाबला केवळ लखनौविरुद्धचा हा शेवटचा साखळी सामना जिंकून चालणार नाही, तर...
IPL Playoff Scenario : प्ले-ऑफच्या शर्यतीत टिकण्यासाठी पंजाबची लखनौविरुद्ध ‌‘करो या मरो‌’ची लढाई
Published on
Updated on

नवी दिल्ली : ‌‘आयपीएल 2026‌’च्या प्ले-ऑफमधील आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी पंजाब किंग्ज शनिवारी आधीच स्पर्धेतून बाद झालेल्या लखनौ सुपर जायंटस्‌‍विरुद्ध (एलएसजी) मैदानात उतरणार आहे. हंगामाच्या सुरुवातीला जेतेपदाचे प्रबळ दावेदार वाटणाऱ्या पंजाबच्या संघाला उत्तरार्धात लागलेल्या पराभवाच्या मालिकेमुळे आता अस्तित्वाची लढाई खेळावी लागत आहे. 25 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 265 धावांचा ऐतिहासिक पाठलाग केल्यानंतर पंजाबच्या कामगिरीला अचानक ग्रहण लागले. पहिल्या 7 सामन्यांपैकी 6 सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानी असणाऱ्या श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जला त्यानंतर सलग 6 पराभवांचा सामना करावा लागला आहे. या खराब कामगिरीमुळे संघ थेट पाचव्या स्थानावर घसरला असून, त्यांचे प्ले-ऑफचे भवितव्य आता अधांतरी आहे.

प्ले-ऑफचे समीकरण

पंजाबला केवळ लखनौविरुद्धचा हा शेवटचा साखळी सामना जिंकून चालणार नाही, तर रविवारच्या सामन्यांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागेल. पंजाबला प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी मुंबई इंडियन्सचा राजस्थान रॉयल्सकडून आणि कोलकाता नाईट रायडर्सचा दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव होणे गरजेचे आहे. राजस्थानने मुंबईला हरवल्यास पंजाबचे आव्हान अधिकृतपणे संपुष्टात येईल, तर ‌‘केकेआर‌’चा विजय झाल्यास नेट रन रेट महत्त्वाचा ठरेल, ज्यामध्ये सध्या पंजाबकडे कोलकात्यापेक्षा किंचित आघाडी आहे.

पंजाबच्या फॉर्मची चिंता

महत्त्वाच्या सामन्यापूर्वी पंजाबच्या फलंदाजीतील उणिवा समोर आल्या आहेत. प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंग आणि कुपर कॉनोली या आक्रमक टॉप ऑर्डरला गेल्या काही सामन्यांत अपयश आले आहे. प्रियांशने गेल्या 7 डावांत फक्त एक अर्धशतक झळकावले असून, मागच्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता. कर्णधार श्रेयस अय्यरचा फॉर्मही घसरला असून, सलग 6 पराभवांच्या प्रवासात त्याला केवळ एकदाच पन्नास धावांचा टप्पा ओलांडता आला आहे. खराब क्षेत्ररक्षण आणि सुटणारे झेल ही संघासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.

लखनौची स्थिती

दुसरीकडे, गेल्या 10 सामन्यांपैकी अवघे 2 सामने जिंकू शकलेला लखनौ सुपर जायंटस्‌‍चा संघ प्ले-ऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडला आहे. मागच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने त्यांचा 7 गडी राखून पराभव केला होता, त्या लढतीत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने वादळी खेळी केली होती. तथापि, इकाना स्टेडियमवरील गेल्या दोन सामन्यांत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध मिळालेल्या विजयांमुळे लखनौचा आत्मविश्वास वाढलेला असेल. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्श आणि जॉश इंग्लिस या जोडीने गेल्या सामन्यात अवघ्या 8.2 षटकांत 109 धावांची भागीदारी केली होती, त्यामुळे संघाची मदार पुन्हा त्यांच्यावर असेल. निकोलस पूरन आणि कर्णधार ऋषभ पंत या हंगामाचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न करतील. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी या सामन्यात पुनरागमन करणार का, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news