IPL 2026 RR : राजस्थान रॉयल्सला विजय अनिवार्य! दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर लखनौविरुद्ध ‌‘करो किंवा मरो‌’ची स्थिती

IPL 2026 RR : राजस्थान रॉयल्सला विजय अनिवार्य! दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर लखनौविरुद्ध ‌‘करो किंवा मरो‌’ची स्थिती
Published on
Updated on

जयपूर : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील बाद फेरीच्या (प्ले ऑफ) आशा अंधूक झालेल्या राजस्थान रॉयल्स संघाला आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आज (मंगळवार, दि. 19) तिन्ही आघाड्यांवर आपला खेळ बराच उंचवावा लागेल. स्पर्धेतून आधीच बाहेर पडलेल्या लखनौविरुद्धचा हा सामना राजस्थानसाठी ‌‘करो किंवा मरो‌’ असा असेल.

धावांचा पाऊस पडणाऱ्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सला या हंगामात अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही. या मैदानावरील त्यांचा हा शेवटचा सामना आहे. आजच्या सामन्यानंतर राजस्थानचा अंतिम सामना गुणतालिकेत तळाशी असलेल्या मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात राजस्थानने फलंदाजीत चांगली कामगिरी करणे अपेक्षित होते; परंतु खालच्या फळीतील फलंदाजी कोसळल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात राजस्थानची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणही अत्यंत साधारण दर्जाचे राहिले.

सलामी आणि मधल्या फळीतील चिंता

राजस्थानचा संघ 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या आक्रमक सुरुवातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. मात्र, दुसऱ्या बाजूने यशस्वी जैस्वालकडून त्याला हवी तशी साथ मिळालेली नाही. ध्रुव ज्युरेलने काही चांगल्या खेळी केल्या आहेत; परंतु रविवारी दुसऱ्या बाजूने विकेट पडत गेल्याने त्याची खेळी संथ राहिली. कर्णधार रियान परागला हंगामाच्या पूर्वार्धात सूर गवसला नव्हता, मात्र, मागील काही सामन्यांत त्याने आपला खेळ उंचावला आहे. फलंदाजीत शेवटच्या 5 षटकांमध्ये अधिक सरस कामगिरी व्हावी, अशी त्याची अपेक्षा असेल.

लखनौसाठी गमावण्यासारखे काहीच नाही

दुसरीकडे, विविध अडचणींचा सामना करणारा लखनौ सुपर जायंटस्‌‍ संघ गेल्या सामन्यातील विजयाचा आत्मविश्वास घेऊन मैदानात उतरेल. त्यांनी यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला होता. आता उर्वरित दोन सामन्यांमध्ये (शेवटचा सामना पंजाब किंग्जविरुद्ध) विजय मिळवून राजस्थानचे समीकरण बिघडवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. फलंदाजी ही लखनौची कमकुवत बाजू राहिली असली, तरी मिचेल मार्शने चेन्नईविरुद्ध वादळी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता. ऋषभ पंतला या हंगामात फलंदाजीचा निश्चित क्रम मिळालेला नाही आणि गेल्या सामन्यात तो फलंदाजीलाही आला नव्हता. लखनौचे आव्हान संपुष्टात आले असले, तरी उर्वरित सामने जिंकून शेवट गोड करण्याचा त्यांचा निर्धार असेल.

हेड टू हेड

  • एकूण सामने : 7

  • राजस्थान विजयी : 5

  • लखनौ विजयी : 2

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news