IPL 2025: बंगळूरमध्ये जोरदार पावसामुळे टॉसला विलंब; RCB विरूद्ध KKR मॅचचे काय होणार? सामना झाला नाही तर कुणाला फायदा?
IPL 2025 RCB vs KKR
बंगळूरू : ऑपरेशन सिंदूरनंतर भारतातील आयपीएल 2025 स्पर्धा स्थगित करण्यात आली. अगदी धर्मशाला येथील मैदानावर पंजाबची मॅच ऐनभरात असताना भारत-पाकिस्तान सीमेवर युद्ध पेटल्याने तो सामना अर्धवट स्थितीतच बंद करावा लागला होता. युद्धविरामानंतर 17 मे पासून आयपीएल स्पर्धेला पुन्हा सुरवात होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
तथापि, पावसामुळे या सामन्याला आता उशीर होत आहे. बंगळूर येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर शनिवार 17 मे 2025 रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स हे दोन संघ भिडणार आहेत. तथापि, जोरदार पावसामुळे सध्या ग्राऊंड आणि पिच झाकून ठेवली असून नाणेफेकला देखील विलंब झाला आहे.
कोलकातासाठी महत्वाचा सामना
शनिवारी होणारा हा सामना KKR साठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण त्यांना प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील. मात्र, बंगळुरूमधील हवामानामुळे त्यांची आशा धोक्यात आली आहे. जर आजचा सामना पावसामुळे रद्द झाला, तर तीन वेळा विजेते ठरलेले KKR स्पर्धेतून बाहेर पडतील.
वॉशआउटचा RCB आणि KKR वर परिणाम काय होईल?
RCB सध्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि त्यांचे 16 गुण आहेत. जर आजचा सामना त्यांनी जिंकला, तर प्लेऑफसाठी पात्र ठरणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगलूरू पहिला संघ ठरेल. दोन गुणांनी ते अव्वल स्थानी जाऊ शकतात आणि टॉप 2 मध्ये राहण्याची त्यांची संधी अधिक पक्की होईल.
दुसरीकडे, KKR ला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे. त्यांना 15 गुण मिळवावे लागतील आणि त्यानंतर इतर सामन्यांमध्ये त्यांना अनुकूल निकालांची अपेक्षा ठेवावी लागेल.
खेळपट्टीचा रिपोर्ट काय?
एम. चिन्नास्वामी स्टेडियम एका बाजूला 68 मीटर, दुसऱ्या बाजूला 62 मीटर आणि सरळ मैदानावर 74 मीटर लांबीचे आहे. हंगामाच्या सुरुवातीला जलद गोलंदाजांनी येथे चांगली कामगिरी केली होती. मात्र, सध्याची खेळपट्टी फलंदाजांसाठी जणू स्वर्गासारखी आहे.
पाऊस पडण्याआधी स्टेडियममध्ये खूपच कमी ओलावा होता. खेळपट्टी कोरडी आणि सुंदर होती. त्यामुळे धावा मोठ्या संख्येने होतील अशी अपेक्षा होती. इयान बिशप आणि अॅरॉन फिंच यांनी हे निरिक्षण नोंदवले होते. तथापि, हे निरिक्षण पावसाला सुरूवात होण्यापुर्वीचे आहे.
नाणेफेक उशिरा!
M. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू येथे जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याची नाणेफेक (टॉस) करण्यात उशिरा झाली आहे.
पावसाचा अंदाज आधीपासूनच होता आणि सध्या मैदानात पूर्णपणे आच्छादन केले आहे. सायंकाळी 7 वाजता बंगळूरूमधील वातावरण ढगाळ आहे.
भारत-पाकिस्तान दरम्यान वाढत्या तणावामुळे स्थगित केलेली आयपीएल स्पर्धा एक आठवड्याच्या विश्रांतीनंतर IPL 2025 पुन्हा सुरू होत आहे.

