

चेन्नई; वृत्तसंस्था : नवे प्रशिक्षक खालिद जमील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय पुरुष फुटबॉल संघाने सॅफ नेशन्स चषक फुटबॉल स्पर्धेत शनिवारी आपल्या पहिल्याच सामन्यात शानदार विजय नोंदवला आहे. सलामीच्या सामन्यात भारताने यजमान आणि क्रमवारीत वरचढ असलेल्या तझाकिस्तानचा त्यांच्याच भूमीवर 2-1 अशा गोल फरकाने पराभव केला. भारताकडून अन्वर अली आणि संदेश झिंगन यांनी गोल केले, तर गुरप्रीत सिंग संधूने एक महत्त्वपूर्ण पेनल्टी वाचवत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
जवळपास दोन वर्षांनंतर परदेशी भूमीवर भारताचा हा पहिलाच विजय आहे. यापूर्वी नोव्हेंबर 2023 मध्ये विश्वचषक पात्रता फेरीत भारताने कुवेतला हरवले होते. सेंट्रल हिसोर स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. सामन्याच्या पाचव्या मिनिटालाच बचावपटू अन्वर अलीने हेडरद्वारे गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अन्वर अलीच्या क्रॉसवर राहुल भेकेने मारलेला हेडर तझाकिस्तानच्या गोलरक्षकाने अडवला, मात्र परतीच्या चेंडूवर संदेश झिंगनने गोल करत भारताची आघाडी 2-0 अशी मजबूत केली.
यजमान संघाकडून शाहरोम समिएवने एक गोल करत सामन्यात रंगत आणली. दुसर्या सत्रात विक्रम प्रताप सिंगच्या चुकीमुळे तझाकिस्तानला पेनल्टी मिळाली, पण भारताचा अनुभवी गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधूने अप्रतिम बचाव करत संघाची आघाडी कायम राखली. सुनील छेत्री आणि मोहन बगान या खेळाडूंच्या अनुपस्थितीतही संघाने ही दमदार कामगिरी केली. या विजयामुळे भारताने स्पर्धेत विजयी सुरुवात केली असून, आता भारताचा पुढील सामना सोमवारी (1 सप्टेंबर) बलाढ्य इराणशी होणार आहे.