पुढारी ऑनलाईन डेस्क : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) प्रतिष्ठेच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे ( Champions Trophy 2025 ) यजमानपद पाकिस्तानकडे आहे. आज लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होण्यापूर्वी चक्क भारतीय राष्ट्रगीताची धून वाजविण्यात आली, असे वृत्त 'इंडिया टूडे'ने दिले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामना लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर सुरु आहे. . आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आयोजित केलेल्या प्रत्येक क्रिकेट सामन्यापूर्वी, दोन्ही स्पर्धक संघांचे राष्ट्रगीताची धून वाजवली जाते. नाणेफेकीनंतर हा समारंभ होतो जिथे दोन्ही संघांना हस्तांदोलन करण्याची संधी मिळते. आज लाहोरच्या गद्दाफी मैदानावर ऑस्ट्रेलियाऐवजी भारतीय राष्ट्रगीताची धून वाजवण्यास सुरुवात केली. आयोजकांना ही चूक लक्षात आली. मात्र यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि गद्दाफी स्टेडियममधील प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला.
पाकिस्तानमध्ये खेळणार नाही, असे भारताने स्पष्ट केल्यानंतर चॅम्पियन ट्रॉफीच्या यजमानपदासाठी हायब्रिड मॉडेल स्वीकारण्यात आले. भारत क्रिकेट संघाचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानमध्ये एकही सामना खेळत नाही. तरीही आज ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रगीत वाजविण्या ऐवजी भारतीय राष्ट्रगीत वाजवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. आयोजकांनी ती चूक दुरुस्त करण्यापूर्वी प्रेक्षकांना ही चूक लक्षात आली आणि त्यांनी त्यावर प्रतिक्रियाही दिली. दरम्यान, चाहते सोशल मीडियावर पाकिस्तानचा व्हिडिओ शेअर करून त्याची खिल्ली उडवत आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा उद्घाटन समारंभ रविवारी (१६ फेब्रुवारी) लाहोरमध्ये पार पडला. तथापि, या काळात लाहोरमधील गद्दाफी स्टेडियम आणि कराचीतील राष्ट्रीय स्टेडियममध्ये भारतीय ध्वज दिसला नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या इतर सात संघांचे झेंडे मैदानावर दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. पाकिस्तानच्या वैफल्यग्रस्त कृत्यावर भारतीय क्रिकेट चाहत्यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.