पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारत आणि ऑस्ट्रेलियात ५ कसोटींची मालिका सुरु आहे. यातील पर्थ येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत (Australia vs India 1st Test) भारताने ऑस्ट्रेलियाला 295 धावांनी नमवले. भारताच्या विजयाचे यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, कर्णधार जसप्रीत बुमराह हे शिल्पकार ठरले.
पहिल्या डावात लवकर ऑलआउट झाल्यानंतर दुसऱ्या डावात भारताने जोरदार कमबॅक केले. दुसऱ्या डावात सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि कैएल राहुल यांनी 201 धावांची सलामी दिली. यानंतर विराट कोहलीनेदेखील दमदार शतक ठोकले. पहिल्या डावातील 46 धावांच्या आघाडीसह भारताने दुसऱ्या डावात 487 धावा कुटल्या आणि विजयासाठी कांगारूंना 536 धावांचे आव्हान दिले होते. मात्र ऑस्ट्रेलिया संघ केवळ 238 धावांतच गारद झाला. दुसऱ्या डावामध्ये भारताकडून कर्णधार बुमराह आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी 3 विकेट्स, वॉशिंग्टन सुंदरने 2 विकेट, नितीश रेड्डी आणि हर्षित राणाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
पर्थमध्ये 16 वर्षानंतर भारताचा विजय झाला आहे. जसप्रीत बुमराहने या कसोटी सामन्यात शानदार गोलंदाजी करत 8 विकेट्स घेत कांगारुंच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. पहिल्या डावात बुमराहने 5 विकेट घेतल्या. तर दुसऱ्या डावात 3 विकेट्स घेत कमाल केली.
यशस्वी जैस्वालने दुसऱ्या डावात १६१ धावांची खेळी केली. पहिल्या डावात जैस्वाल शुन्यावर बाद झाला होता. यामुळे चाहते निराश झाले होते. पण दुसऱ्या डावात या युवा फलंदाजाने ऑस्ट्रेलियाला घाम फोडला आणि शतक झळकावले.
पहिल्या डावात 150 धावांवर ऑलआऊट झाल्यानंतर जसप्रीत बुमराहने सामन्याला कलाटणी दिली. बुमराहने पहिल्या डावात 18 षटकात केवळ 30 धावा देत 5 बळी घेतले. नवोदित हर्षित राणानेही बुमराहच्या या घातक स्पेलचा फायदा घेत भारतीय संघाची सर्वात मोठी डोकेदुखी ट्रॅव्हिस हेडला आपला बळी बनवले. हर्षितने 48 धावांत 3 बळी घेतले. उरलेले कार्य मोहम्मद सिराजने पूर्ण केले ज्याने 20 धावांत 2 बळी घेतले. टीम इंडियाच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियन संघ पूर्णपणे असहाय्य दिसला. कांगारूंचा डाव केवळ 104 धावांवर गडगडला. ऑस्ट्रेलियाच्या 7 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही यावरून भारताच्या धोकादायक गोलंदाजीचा अंदाज लावता येतो. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 26 धावांची खेळी केली.
विराट कोहलीने जुलै 2023 मध्ये कसोटीत शेवटचे शतक झळकावले होते. ते शतक वेस्ट इंडिज दौऱ्यात विराटच्या बॅटमधून आले होते. आता 17 महिन्यांनंतर माजी भारतीय कर्णधाराने कसोटीत शतक झळकावले आहे. 2019 पर्यंत विराटची कसोटीत 27 शतके होती. त्यानंतर त्याचे हे केवळ तिसरे शतक आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या मालिकेत सपशेल अपयशी ठरल्यानंतर त्याच्या संघातील स्थानाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते