

तिरुवनंतपूरम; वृत्तसंस्था : इशान किशनच्या शतकी झंझावाताला सूर्यकुमार यादव व हार्दिक पंड्या यांच्या आतषबाजीची साथ लाभल्यानंतर भारताने येथील पाचव्या व शेवटच्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा 46 धावांनी धुव्वा उडवला आणि 5 सामन्यांची ही मालिका 4-1 फरकाने जिंकली. प्रारंभी, इशान किशन 103, सूर्यकुमार 63 व हार्दिक पंड्या 42 यांच्या फटकेबाजीच्या बळावर भारताने निर्धारित 20 षटकांत 5 बाद 271 धावांपर्यंत मजल मारली तर प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव 19.4 षटकांत सर्वबाद 225 धावांमध्ये संपुष्टात आला.
विजयासाठी 272 धावांचे आव्हान असताना टीम सेफर्ट 5 स्वस्तात बाद झाल्यानंतर फिन अॅलनने 38 चेंडूंत सर्वाधिक 80 धावा फटकावल्या. तिसर्या क्रमांकावरील रचिन रवींद्रने 17 चेंडूत 30 धावा केल्या. या जोडीने दुसर्या गड्यासाठी 100 धावांची भागीदारी साकारली. नवव्या षटकापर्यंत न्यूझीलंडचा संघ 1 बाद 117 अशा भक्कम स्थितीत होता. मात्र, याच धावसंख्येवर फिन अॅलन बाद झाला आणि तेथून न्यूझीलंडच्या घसरगुंडीला सुरुवात झाली. केवळ 108 धावांमध्येच त्यांनी शेवटचे 9 फलंदाज गमावले. भारतीय संघातर्फे डावखुर्या अर्शदीपने 4 षटकांत 51 धावा दिल्या असल्या तरी त्याबदल्यात 5 गडी गारद केले.
प्रारंभी, सलामीवीर इशान किशनचे पहिलेवहिले धडाकेबाज शतक आणि सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने 271 धावांचा डोंगर उभा केला. इशानने अवघ्या 43 चेंडूंत 6 चौकार, 10 षटकारांसह 103 धावांची आतषबाजी केली तर सूर्यकुमार यादवने 30 चेंडूंत 63 धावा फटकावल्या. हार्दिक पंड्यानेही यात समयोचित योगदान देताना अवघ्या 17 चेंडूंत 42 धावा वसूल केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 247.05 इतका लक्षवेधी ठरला.
या त्रिकुटाच्या जोरदार फलंदाजीच्या बळावर या सामन्यात भारताने निर्धारित 20 षटकांत 5 बाद 271 धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.
इशान किशनने आक्रमक फलंदाजी करत आपल्या कारकिर्दीतील पहिले शतक साजरे केले. दुसर्या बाजूला, सूर्यकुमार यादवने 30 चेंडूंत 63 धावांची वेगवान खेळी केली, मात्र 15 व्या षटकात तो बाद झाला. तत्पूर्वी, अभिषेक शर्माने 16 चेंडूंत 30 धावांचे योगदान दिले, तर अनुभवी संजू सॅमसनची खराब कामगिरीची मालिका या सामन्यातही कायम राहिली. सॅमसन अवघ्या 6 धावांवर लॉकी फर्ग्युसनचा बळी ठरला.
23 : भारताने एकाच टी-20 डावात सर्वाधिक 23 षटकारांच्या आपल्याच विक्रमाशी बरोबरी साधली.
10 : भारताच्या डावातील 23 पैकी 10 षटकार एकट्या सूर्यकुमार यादवने फटकावले.
5 : संजू सॅमसनची खराब कामगिरीची मालिका या लढतीतही कायम राहिली. टी-20मधील शेवटच्या 5 डावांत त्याच्या धावा अनुक्रमे 10, 6, 0, 24, 6 अशा अतिशय किरकोळ राहिल्या आहेत.