नवी दिल्ली : क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली असून, आगामी आशिया चषक टी-20 स्पर्धेचे यजमानपद भारतीय क्रिकेट नियामक मंडळ भूषवणार आहे. ही स्पर्धा संयुक्त अरब अमिराती येथे खेळवली जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. आशियाई क्रिकेट परिषदेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत याची अधिकृत घोषणा केली जाईल. या निर्णयामुळे सप्टेंबर महिन्यात क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना पाहण्याची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
गुरुवारी झालेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीत सर्व 25 सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष किंवा व्हर्च्युअली सहभागी झाले होते. ‘बीसीसीआय’चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या बैठकीत व्हर्च्युअल माध्यमातून सहभाग नोंदवला. या बैठकीनंतर स्पर्धेच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
यासंदर्भात बोलताना ‘बीसीसीआय’चे सचिव देवजित सैकिया म्हणाले, आमचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला बैठकीत सहभागी झाले होते. ते लवकरच सदस्यांना माहिती देतील.