

कोतंबी-बडोदा; वृत्तसंस्था : आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेला केवळ महिन्याभरापेक्षा कमी कालावधी बाकी असतानाही क्रिकेट विश्वाचे लक्ष विराट, रोहितसाठी पुन्हा एकदा वन डे क्रिकेटकडे लागून राहिलेले असणार आहे. भारत-न्यूझीलंड यांच्यात रविवारी (दि. 11) पहिली वन डे खेळवली जाणार असून, यात या दिग्गज फलंदाजांना कसा बहर लाभेल, याची उत्सुकता असेल. या लढतीला दुपारी दीड वाजता सुरुवात होईल.
पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरलेला यजमान भारतीय संघ आणि नव्या चेहर्यांचा समावेश असलेला न्यूझीलंडचा संघ यांच्यात या लढतीत जुगलबंदी अपेक्षित आहे. पुढील 7 दिवसांत होणार्या या 3 सामन्यांच्या मालिकेत विराट आणि रोहितच्या फॉर्मवर भारताची मदार असेल. विजय हजारे करंडकाच्या लीग फेरीत काही सामने खेळून या दोन्ही सुपरस्टार्सनी धावांचा डोंगर उभा केला आहे. यामुळे ते अद्यापही फॉर्मात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
टी-20 विश्वचषकाच्या संघातून वगळल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल या मालिकेत कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. गेल्या वर्षाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत दुखापतीमुळे तो बहुतांश काळ संघाबाहेर होता. आता गिलच्या पुनरागमनामुळे यशस्वी जैस्वालला अव्वल फळीतून बाहेर बसावे लागू शकते.
श्रेयस अय्यरच्या पुनरागमनामुळे भारतीय फलंदाजीच्या क्रमातील गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले प्रयोग थांबण्याची शक्यता आहे. 31 वर्षीय अय्यर आपल्या चौथ्या क्रमांकावर पुन्हा खेळताना दिसेल. तसेच के. एल. राहुल यष्टिरक्षक आणि खालच्या फळीतील फलंदाज म्हणून आपली भूमिका चोख बजावत असल्याने, ऋषभ पंतला अंतिम 11 मध्ये स्थान मिळवणे कठीण जाईल.
स्पीडस्टार जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या यांना आगामी टी-20 सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यावर असेल. फिरकी विभागात कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा यांची महत्त्वाची भूमिका असेल.
न्यूझीलंडसाठी ही मालिका त्यांच्या राखीव फळीतील खेळाडूंची चाचणी घेण्याची उत्तम संधी आहे. गेल्या वर्षीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमधील पराभवाचा विचार न करता किवी संघ नव्या जोमाने मैदानात उतरेल. 2024-25 मध्ये भारताला कसोटी मालिकेत 3-0 ने पराभूत करताना जो आत्मविश्वास त्यांनी दाखवला होता, तोच या मालिकेतही कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
नियमित कर्णधार केन विल्यम्सन, टॉम लॅथम आणि मिचेल सँटेनर यांच्या अनुपस्थितीत मायकल ब्रेसवेल संघाचे नेतृत्व करेल. रचिन रवींद्र आणि जेकब डफी यांना विश्रांती देण्यात आली आहे, तर मॅट हेन्री टी-20 मालिकेसाठी सज्ज होत आहे.
बडोदा क्रिकेट असोसिएशनच्या कोतंबी येथील नवीन स्टेडियमवर होणारा हा पहिलाच पुरुष आंतरराष्ट्रीय सामना आहे. यापूर्वी येथे केवळ महिलांचे आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत.