पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई कसोटीचा पहिला दिवस न्यूझीलंडच्या नावावर राहिला. त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 235 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने दिवसाचा खेळ संपेपर्यंत पहिल्या डावात चार गडी गमावून 86 धावा केल्या आहेत. शुभमन गिल (31*) आनि ऋषभ पंत (1*) क्रिजवर आहेत. भारत अजूनही न्यूझीलंडपेक्षा 149 धावांनी मागे आहे.
एकेकाळी टीम इंडियाची धावसंख्या एक बाद 78 होती. पण टीम इंडियाने पुढील सहा धावा करताना तीन विकेट गमावल्या आहेत. पहिला एजाज पटेलने सलग दोन चेंडूंवर यशस्वी जैस्वाल (30) आणि मोहम्मद सिराज (0) यांना बाद केले. त्यानंतर विराट कोहली (4) धावबाद झाला. त्याआधी रोहित शर्माच्या (18) रुपाने भारताला पहिला झटका बसला. त्याची विकेट मॅट हेन्रीने घेतली. स्लिपमध्ये लॅथमने झेलबाद पकडला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. संघाला 15 धावांवर पहिला धक्का बसला. आकाश दीपने डेव्हॉन कॉनवेला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याला चार धावा करता आल्या. यानंतर कर्णधार टॉम लॅथमने विल यंगसोबत 44 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी वॉशिंग्टन सुंदरने मोडली. त्याने लॅथमला क्लीन बोल्ड केले. लॅथम 28 धावा करून बाद झाला. यानंतर सुंदरने रचिन रवींद्रलाही क्लीन बोल्ड केले. त्याला पाच धावा करता आल्या. सुंदरने सलग तीन डावात तिसऱ्यांदा रचिनला बाद केले.
रचिन बाद झाल्यानंतर यंगने डॅरिल मिशेलसोबत चौथ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली. यादरम्यान यंगने कसोटी कारकिर्दीतील आठवे अर्धशतक झळकावले. ही भागीदारी रवींद्र जडेजाने मोडली. जडेजाने किवी डावाच्या 44व्या षटकात दोन विकेट घेतल्या. त्याने प्रथम यंगला स्लिपमध्ये झेलबाद केले. त्यानंतर टॉम ब्लंडेल क्लीन बोल्ड झाला. यंगने 71 धावांची खेळी खेळली. त्याचवेळी ब्लंडेलला खातेही उघडता आले नाही. यानंतर जडेजाने ग्लेन फिलिप्सलाही क्लीन बोल्ड केले. त्याला 17 धावा करता आल्या.
यानंतर जडेजाने या डावात दुसऱ्यांदा एका षटकात दोन बळी घेतले. त्याने किवी डावाच्या 61 व्या षटकात ईश सोधी आणि मॅट हेन्री यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. सोढी एलबीडब्ल्यू आऊट झाला, तर हेन्री क्लीन बोल्ड झाला. सोधीने सात धावा केल्या, तर हेन्रीला खातेही उघडता आले नाही. वॉशिंग्टन सुंदरने डॅरिल मिशेल आणि एजाज पटेल (7) यांना बाद करत न्यूझीलंडचा डाव 235 धावांत गुंडाळला.