

पुढारी ऑनलाईन डेस्क : India vs New Zealand, 1st Test | बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत न्यूझीलंडने भारताचा आठ गडी राखून पराभव केला. पहिल्या डावात कमी धावसंख्येमुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या विजयासह किवी संघाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पुढील सामना २४ ऑक्टोबरपासून पुण्यात होणार आहे.
न्यूझीलंडला 35 धावांवर दुसरा झटका बसला. टॉम लॅथमनंतर जसप्रीत बुमराहने डेव्हॉन कॉनवेला बाद केले. दोघांनाही बुमराहने पायचीत केले. न्यूझीलंडला विजयासाठी 72 धावांची गरज आहे, तर टीम इंडियाला आठ विकेट्सची गरज आहे.
शून्यावर न्यूझीलंडला पहिला धक्का बसला. पाचव्या दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर बुमराहने कर्णधार टॉम लॅथमला एलबीडब्ल्यू आऊट केले. लॅथमला खातेही उघडता आले नाही.
बेंगळुरूमध्ये आज सकाळी पावसाने हजेरी लावली. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळपट्टी ओली असल्याने सामना सुरू होण्यास विलंब झाला आहे. मैदान कव्हरने झाकले असून आता ९:४५ वाजता पुन्हा एकदा वातावरणाचा आढावा घेऊन सामना सुरू करण्याबात निर्णय घेण्यात येईल. मैदानावरील कव्हर काढण्यात आले असून सामना १०:१५ पर्यंत सुरू होईल.
सलामीच्या सामन्यातील पहिल्या डावात ऐतिहासिक पडझडीनंतर भारतीय फलंदाजांनी दुसर्या डावात जबरदस्त बाऊन्स बॅक केला. मात्र, शेवटच्या फळीतील फलंदाजांना साजेशी कामगिरी करता न आल्याने भारताला मजबूत आघाडी घेता आली नाही. सर्फराज खान (150 धावा) आणि ऋषभ पंत (99 धावा) यांनी भारत-न्यूझीलंड कसोटीचा चौथा दिवस गाजवला, पण नव्या चेंडूसह न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी पुन्हा घाम फोडला. संघाच्या 408 धावा असताना सर्फराज बाद झाला आणि त्यानंतर पुढील 54 धावांत भारताचे 7 फलंदाज तंबूत परतले. भारताचा डाव 462 धावांत संपुष्टात आला. त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी 107 धावांचे टार्गेट मिळाले होते. आज (दि.20) सामन्याच्या शेवटच्या दिवशी न्यूझीलंडने हे आव्हान पूर्ण केले. न्यूझीलंडने भारतावर ८ गडी राखून विजय मिळवला.