

चेन्नई ; वृत्तसंस्था : ज्युनिअर हॉकी विश्वचषक स्पर्धेतील उपांत्यपूर्व लढतीत आज भारतासमोर बेल्जियमचे तगडे आव्हान असेल. आतापर्यंत फारशी पारख न झालेल्या भारतीय बचाव फळीचा येथे कस लागू शकतो. साखळी फेरीत भारताने दमदार कामगिरी करत 29 गोल नोंदवले आणि यादरम्यान, एकही गोल स्वीकारलेला नाही. मात्र, आता बेल्जियमविरुद्ध यजमान संघाला आपला खेळ विशेष उंचवावा लागणार आहे. ही लढत रात्री 8 वाजता खेळवली जाईल.
पी. आर. श्रीजेश यांच्या मार्गदर्शनाखालील भारतीय संघाने यापूर्वी कमकुवत प्रतिस्पर्धी, चिली, ओमान आणि स्वित्झर्लंड यांच्याविरुद्ध पूलमध्ये जोरदार वर्चस्व गाजवले. दिलराज सिंग (6 गोल) आणि मनमीत सिंग (5) यांच्या नेतृत्वाखालील फॉरवर्ड लाईन प्रभावी ठरली आणि रोशन कुजूरच्या नेतृत्वाखालील मिडफिल्ड भक्कम आहे; मात्र प्रशिक्षक श्रीजेश यांनी काही आघाड्यांवर अद्याप बरीच सुधारणा अपेक्षित असल्याचे म्हटले आहे.
पेनल्टी कॉर्नरचे गोलात रूपांतर करण्याच्या सततच्या चिंतेचेदेखील समूळ उच्चाटन करणे आवश्यक आहे. गेल्या पूल सामन्यात शारदा नंद तिवारीने दोनदा गोल करत सुधारणा दर्शविली असली, तरी रोहित आणि अनमोलसारख्या खेळाडूंना बेल्जियमच्या उच्च दर्जाच्या बचावाविरुद्ध आपला स्ट्राईक रेट लक्षणीयरीत्या वाढवावा लागेल, हे स्पष्ट आहे.
बेल्जियम स्पर्धेतील सर्वात धोकादायक संघ
भारतीय संघ ‘यंग रेड लायन्स’ (बेल्जियम) ला हलक्यात घेऊ शकत नाही. बेल्जियम पूल डी मध्ये स्पेनच्या मागे दुसर्या स्थानावर राहिला असला, तरी तो स्पर्धेतील सर्वात धोकादायक आक्रमक संघांपैकी एक आहे. बेल्जियमने पूल टप्प्यांमध्ये प्रभावी 22 गोल केले आहेत. हे 22 गोल मैदानी आणि पेनल्टी कॉर्नरमध्ये समान विभागले गेले आहेत. कर्णधार रोहित, तालेम प्रियोबर्ता आणि अमीर अली यांच्या नेतृत्वाखालील बचाव फळीला बेल्जियमच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आपले सर्वोत्तम प्रदर्शन करावे लागेल.
अशा रंगतील अन्य उपांत्य लढती
इतर उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये दुपारी 12.30 वाजता स्पेनचा सामना न्यूझीलंडशी होईल. त्यानंतर दुपारी 3 वाजता फ्रान्स गतविजेत्या जर्मनीशी खेळेल आणि नेदरलँडस् अर्जेंटिना यांच्यातील तिसरी लढत सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे.