

ब्रिस्बेन; वृत्तसंस्था : शुक्रवारी येथे झालेल्या तिसर्या आणि निर्णायक युवा वन-डे सामन्यात भारताच्या 19 वर्षांखालील संघाने ऑस्ट्रेलिया 19 वर्षांखालील संघाचा 167 धावांनी मोठा पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश संपादन केले. मधल्या फळीतील फलंदाज वेदांत त्रिवेदी आणि राहुल कुमार यांनी अर्धशतके झळकावली, तर युवा डावखुरा फिरकी गोलंदाज खिलान पटेलने चार बळी घेतले.
वेदांत (92 चेंडूंत 86 धावा) आणि राहुल कुमार (84 चेंडूंत 62 धावा) यांच्यात झालेल्या 99 धावांच्या महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे भारताने 9 बाद 280 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात यजमान संघ 28.3 षटकांत अवघ्या 113 धावांवर गारद झाला.
विजयासाठी 281 धावांचे आव्हान असताना ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाची सुरुवात खराब झाली. त्यांनी केवळ 39 धावांवर तीन गडी गमावले. डावखुरा वेगवान गोलंदाज उद्धव मोहन (26 धावांत 3 बळी) आणि फिरकीपटू खिलान पटेल (26 धावांत 4 बळी) यांच्या भेदक मार्यासमोर यजमान संघाचा अजिबात टिकाव लागला नाही. यासह भारताने मालिकेतला सर्वात मोठा विजय नोंदवला. यापूर्वी भारताने यजमान संघाचा सात गडी आणि 51 धावांनी पराभव केला होता.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार्या भारताची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार आयुष म्हात्रे 4 धावांवर बाद झाला. या मालिकेत त्याची ही तिसरी एकेरी धावसंख्या ठरली. याशिवाय, मागील सामन्यात अर्धशतक झळकावणारा वैभव सूर्यवंशी येथे 16 धावा काढून तंबूत परतला. संघाची स्थिती 2 बाद 36 अशी असताना डावखुरा फलंदाज विहान मल्होत्राने सावध फलंदाजी करत 52 चेंडूंत 40 धावा केल्या आणि त्याने वेदांतसह 69 धावांची भागीदारी रचली. या मालिकेत दोन अर्धशतके झळकावणारा वेदांत हा भारतासाठी महत्त्वाचा फलंदाज ठरला आहे.
यष्टिरक्षक फलंदाज हरवंश पंगालिया (23 धावा) आणि अखेरच्या फळीतील फलंदाज खिलान पटेलच्या नाबाद 19 धावांच्या योगदानामुळे भारत 19 वर्षांखालील संघाला लढण्याजोगी धावसंख्या गाठता आली. ही धावसंख्या यजमान संघासाठी मात्र खूपच मोठी ठरली. ऑस्ट्रेलियन संघाने नियमित अंतराने विकेटस् गमावल्या. यात केवळ तीन फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. भारताचा 19 वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज उद्धव मोहन (3/26) याने सलामीवीर अॅलेक्स ली यंग, स्टीव्हन होगन आणि कर्णधार विल मलाजझुक यांना झटपट बाद करत ऑस्ट्रेलियाची आघाडीची फळी उद्ध्वस्त केली. यानंतर डावखुरा फिरकी गोलंदाज खिलान पटेलने मधली फळी आणि अखेरची फळी मोडून काढत यजमान संघाला मालिकेतील सर्वात मोठ्या पराभवाला सामोरे जाण्यास भाग पाडले.