पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिला सामना आज (दि.२०) भारताने गमावला. बंगळूरु कसोटीत पहिल्या डावात फलंदाजांच्या हाराकिरीनंतर टीम इंडियाने दुसर्या डावात कमबॅकचा प्रयत्न केला;पण अखेर सामन्याच्या चौथ्या दिवशीच्या तिसर्या सत्रात पुन्हा एकदा फलंदाजांनी नांगी टाकली आणि भारतावर सामना गमावण्याची नामुष्की आली. आता कसोटी मालिकेत न्यूझीलंडने १-0 अशी आघाडी घेतली आहे. बंगळूर कसोटीतील पराभवानंतरही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या गुणतालिकेत भारत अजूनही अव्वल स्थानावर आहे. मात्र फायनलमध्ये धडक मारण्यासाठी टीम इंडियासमोर मोठे आव्हान असणार आहे. ( world test championship)
तब्बल ३६ वर्षानंतर भारतात कसोटी सामन्या जिंकण्याची कामगिरी न्यूझीलंडच्या संघाने केली आहे. यापूर्वी १९८८ मध्ये जॉन राईटच्या जॉन राईटच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाटने मुंबईतील वानखेडे मैदानावर भारताचा १३६ धावांनी पराभव केला होता. आजच्या पराभवामुळे भारताची मायदेशातील सलग विजयी मालिकाही खंडित झाली आहे. बंगळूरु कसोटी सामन्यापूर्वी भारताने घरच्या मैदानावर सलग सहा कसोटी सामने जिंकले होते. 25 जानेवारी २०२४ राेजी हैदराबादमध्ये इंग्लंडने टीम इंडियाचा 28 धावांनी पराभव केला होता. यानंतर भारताने सलग सहा सामने जिंकले होते. २४ वर्षांनंतर पाहुण्या संघाने भारताने दिलेले शंभरपेक्षा अधिक धावांचे लक्ष्य यशस्वीपणे गाठले आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे पूर्णपणे वाहून गेला. दुसर्या दिवशी नाणेफेक जिंकत कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहितचा हा निर्णय चुकीचा ठरला. भारताचा पहिला डाव ४६ धावांवर आटोपला. ही मायदेशातील सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली आहे.
आता बंगळुरु कसोटीतील पराभवामुळे डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग भारतासाठी निश्चितच थोडा कठीण झाला आहे; परंतु तरीही त्याला पुनरागमन करण्याची संधी आहे. भारताला न्यूझीलंडविरुद्ध अजून दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. तसेच पुढील महिन्यापासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. भारताला अजूनही एकूण सात सामने खेळायचे आहेत. आता WTC गुणतालिकेत पहिल्या दोनमध्ये राहण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत भारताला सातपैकी पाच सामने जिंकावे लागतील. न्यूझीलंडविरुद्धचे उर्वरित दोन सामने आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तीन सामने जिंकण्यात भारताला यश आले तर पुढील वर्षी होणाऱ्या WTC च्या अंतिम फेरीत टीम इंडिया दिमाखात प्रवेश करेल.