

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : 2030 साली होणार्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारताने आपला दावा अधिक मजबूत केला आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयवोए) बुधवारी नवी दिल्लीत झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत या महत्त्वाकांक्षी प्रस्तावाला औपचारिक मंजुरी दिली. या निर्णयामुळे 20 वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे भारतात आयोजन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या स्पर्धेसाठी गुजरात राज्यातील अहमदाबाद शहराला यजमान शहर म्हणून प्रस्तावित करण्यात आले आहे. भारताने यापूर्वीच यजमानपदासाठी ‘स्वारस्य पत्र’ सादर केले होते, ज्याला आता संघटनेची अधिकृत मान्यता मिळाली आहे. यजमानपदाच्या अंतिम शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारताला आपला सविस्तर प्रस्ताव 31 ऑगस्टच्या अंतिम मुदतीपूर्वी राष्ट्रकुल क्रीडा महासंघाकडे सादर करावा लागणार आहे. अहमदाबादमधील अत्याधुनिक क्रीडा सुविधा आणि पायाभूत सुविधांच्या जोरावर भारताचा दावा भक्कम मानला जात आहे.
कॅनडाने यजमानपदाच्या शर्यतीतून अचानक माघार घेतल्याने भारताची दावेदारी अधिक प्रबळ झाली आहे. भारताच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी नुकतेच, राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे क्रीडा संचालक डॅरेन हॉल यांच्या नेतृत्वाखालील एका पथकाने अहमदाबादला भेट दिली. त्यांनी शहरातील क्रीडांगणे आणि इतर सुविधांची पाहणी करून गुजरात सरकारच्या अधिकार्यांशी चर्चा केली. या भेटीनंतर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते. या महिन्याच्या अखेरीस एक मोठे शिष्टमंडळ पुन्हा पाहणीसाठी येणार असून, त्यानंतर अंतिम अहवाल तयार केला जाईल.
या स्पर्धेचे यजमानपद कोणाला मिळणार, याचा अंतिम निर्णय नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात स्कॉटलंडमधील ग्लास्गो येथे होणार्या राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या आमसभेत घेतला जाईल. भारताने यापूर्वी 2010 मध्ये दिल्ली येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते. त्या अनुभवाच्या जोरावर आणि अहमदाबादच्या तयारीमुळे 2030 च्या स्पर्धेचे यजमानपद मिळवण्याची भारताला मोठी संधी आहे. हे यजमानपद मिळाल्यास देशातील क्रीडा संस्कृतीला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.