महिला टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ही 21 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान ऑस्ट्रेलिया येथे होणार असून, जेतेपदासाठी दहा संघ हे एकमेकांसमोर असणार आहेत. आयसीसीकडून खेळवण्यात येणार्या अंडर-19, टी-20 आणि वन-डे वर्ल्डकप अशा तिन्ही स्पर्धा भारताने जिंकल्या आहेत; पण भारतीय महिला संघाला अजून एकही जेतेपद मिळवता आले नाही. महिला क्रिकेटपटूंसाठी ही स्पर्धा अतिशय महत्त्वाची असून, जागतिक स्तरावरील अनेक चांगल्या खेळाडू आपल्याला खेळताना दिसतील. पहिल्यांदा महिलांची विश्वचषक स्पर्धा वेगळी आयोजित केली जात आहे. यावेळी भारतीय संघाकडून देखील अपेक्षा वाढल्या आहेत. विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये दहा संघांची विभागणी दोन गटांत करण्यात आली. दोन्ही गटांमधील अव्वल दोन संघ हे उपांत्य
फेरीत प्रवेश करतील. आता आपण 'अ' गटातील संघांविषयी जाणून घेऊया ज्यामध्ये भारतीय संघाचा देखील समावेश आहे.
भारत : आयसीसी टी-20 क्रमवारी : 4.
टी-20 विश्वचषकातील कामगिरी : 2009, 2010, 2018 (उपांत्य फेरी).
भारतीय संघ या विश्वचषक स्पर्धेसाठी प्रबळ दावेदार समजला जात आहे. भारतीय संघ हा आयसीसी महिला टी-20 क्रमवारीमध्ये सध्या चौथ्या स्थानावर आहे. भारतीय संघाला 21 फेब्रुवारीला आपला पहिला सामना यजमान ऑस्ट्रेलिया संघाशी खेळायचा आहे. नुकत्याच पार पडलेल्या तिरंगी मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाने अंतिम सामन्यात भारताला पराभूत केले होते. त्यामुळे या स्पर्धेत भारतीय संघ चांगल्या कामगिरीचा प्रयत्न करेल. भारतीय संघाची धुरा ही हरमनप्रीत कौरकडे असणार आहे. यासोबत युवा फलंदाज शेफाली वर्माकडे देखील नजरा असणार आहेत. चांगली सुरुवात देण्याची जबाबदारी ही स्मृती मानधनावर असेल. आजवर या स्पर्धेत भारताने 2009, 2010 आणि 2018 साली उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. यासोबत मुंबईची जेमिमाह रॉड्रिंग्ज व वेदा कृष्णामूर्तीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
ऑस्ट्रेलिया : आयसीसी टी-20 क्रमवारी : 1.
टी-20 विश्वचषकातील कामगिरी : 2010, 2012, 2014, 2018 (जेतेपद)
आजवरच्या महिला क्रिकेट व टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम संघ म्हणून ऑस्ट्रेलियाकडे पाहिले जाते. घरच्या मैदानावर विश्वचषक स्पर्धा होणार असल्याने अर्थातच ऑस्ट्रेलियन संघ फेव्हरेट आहे. नुकतीच त्यांनी तिरंगी मालिका जिंकल्याने त्यांचा आत्मविश्वास देखील दुणावला आहे. मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखाली खेळणार्या या संघाकडून अपेक्षादेखील आहेत. फलंदाजी व गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर संघ मजबूत वाटत आहे. यासोबतच घरच्या मैदानावर खेळणार असल्याचे खेळपट्टींची कल्पना देखील त्यांना आहे. त्यामुळे इतर संघांना त्यांचे आव्हान असणार आहे. उद्घाटनीय सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाची गाठ भारताशी आहे. आतापर्यंत टी-20 विश्वचषक स्पर्धांचे त्यांनी चार वेळा जेतेपद मिळवले आहे. संघामध्ये अनेक अष्टपैलूंचा भरणा ही संघासाठी जमेची बाजू आहे. गोलंदाजांमध्ये मेग शट, जेस जोनासेन यांनी चमक दाखवली आहे.
न्यूझीलंड : आयसीसी टी-20 क्रमवारी : 3.
टी-20 विश्वचषकातील कामगिरी : 2009, 2010 (उपविजेतेपद)
न्यूझीलंड संघालादेखील आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये चांगल्या कामगिरीचा अनुभव आहे. सोफी डीवाईनच्या नेतृत्वाखाली खेळणार्या या संघामध्ये खर्या अर्थाने नजरा असतील त्या अनुभवी अष्टपैलू खेळाडू सुझी बेटस्कडे. फलंदाजीची जबाबदारी लॉरेन डाऊन, मॅडी ग्रीन आणि केटी पर्किन्स यांच्यावर असेल; पण स्पर्धेत पुढे जायचे असल्यास सुझी बेटस्ची कामगिरी ही महत्त्वाची असणार आहे. संघाने 2009 आणि 2010 साली टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. या गटात चांगले असल्याने न्यूझीलंड संघालादेखील चमक दाखवावी लागेल. विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघाचा पहिला सामना हा श्रीलंकेशी होणार आहे.
श्रीलंका : आयसीसी टी-20 क्रमवारी : 8.
टी-20 विश्वचषकातील कामगिरी : 2012, 2016 (पाचवे स्थान)
श्रीलंकेच्या संघाला अजूनही महिला क्रिकेटमध्ये म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. मात्र, तरीही यावेळी संघाला चांगली कामगिरी करण्याची संधी आहे. कर्णधार चमारी आटापट्टूच्या नेतृत्वाखाली खेळणार्या श्रीलंकन संघामध्ये हसिनी परेरा, निलाक्षी डिसिल्वा, शशिकला सिरीवर्दनेसारख्या चांगल्या अष्टपैलू खेळाडू आहेत. यासोबत गोलंदाजांवर देखील संघाची जबाबदारी असेल. यावेळी टी-20 विश्वचषक स्पर्धेत उतरताना आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
बांगला देश : आयसीसी टी-20 क्रमवारी : 9.
टी-20 विश्वचषकातील कामगिरी : 2014, 2016, 2018 (नववे स्थान)
बांगला देश संघ हा महिला क्रिकेटमधील तळाच्या संघांपैकी एक आहे. गेल्या तीन विश्वचषक स्पर्धेत संघाला म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. यावेळी सलमा खातूनच्या नेतृत्वाखाली खेळणार्या या संघाचा प्रयत्न आपली कामगिरी सुधारण्याचा असेल. 'अ' गटामध्ये तीन मजबूत संघ असल्याने बांगला देश संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असेल.बांगला देश संघ आपला पहिला सामना भारताशी खेळणार आहे. क्रमवारीतही बांगला देश संघ तळाशी असून आपली कामगिरी उंचवायची असल्यास संघाला विशेष प्रयत्न घ्यावे लागणार आहेत.