

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : बेल्जियम आणि नेदरलँडमध्ये आज शनिवारपासून (दि. १५ ऑगस्ट) सुरू होणाऱ्या ‘एफआयएच पुरुष हॉकी विश्वचषक २०२६’ स्पर्धेत भारतीय संघ आपल्या उज्ज्वल इतिहासाची परंपरा आणि नव्या पिढीच्या आत्मविश्वासासह उतरत आहे. १९७५ मध्ये अजित पाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली क्वालालंपूर येथे भारताने एकमेव विश्वचषक जिंकला होता. त्या ऐतिहासिक विजयाला ५१ वर्षे पूर्ण झाली आहेत. आज १५ ऑगस्ट या आपल्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भारतीय संघ आपल्या मोहिमेची सुरुवात वेल्स विरुद्धच्या सामन्याने करणार आहे.
१९७५ च्या विजयाशी आजच्या संघाचे एक खास साम्य आहे. अजित पाल सिंग यांनी दुसऱ्यांदा कर्णधारपद भूषवताना विश्वचषक जिंकला होता. सध्याचा कर्णधार हरमनप्रीत सिंग हा देखील सलग दुसऱ्या विश्वचषक स्पर्धेत भारताचे नेतृत्व करत आहे. मनप्रीत सिंग हा भारताकडून विक्रमी ४१७ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला सर्वाधिक अनुभवी खेळाडू आहे. संघात ८ खेळाडू प्रथमच विश्वचषक खेळणार आहेत. यामध्ये २३ वर्षीय मध्यरक्षक आदित्य अर्जुन लालागे याचा समावेश आहे.
या वर्षीच्या विश्वचषकात पारंपरिक उपांत्यपूर्व फेरी नसेल. पहिल्या टप्प्यातील चारही गटांतील अव्वल दोन संघ दुसऱ्या टप्प्यात ‘इ’ आणि ‘फ’ गटात प्रवेश करतील. या दुसऱ्या टप्प्यातील अव्वल दोन संघ थेट उपांत्य फेरीत पोहोचतील. विशेष म्हणजे, पहिल्या टप्प्यातील गुण दुसऱ्या टप्प्यात जोडले जाणार आहेत, त्यामुळे प्रत्येक सामना महत्त्वाचा ठरेल.
१५ ऑगस्ट : भारत विरुद्ध वेल्स (दुपारी ४.३० वाजता, भारतीय वेळेनुसार)
१७ ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड (सायंकाळी ६.३० वाजता)
१९ ऑगस्ट : भारत विरुद्ध पाकिस्तान (सायंकाळी ६.३० वाजता)
‘आमच्या संघात ऑलिम्पिक व आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आणि युवा खेळाडूंचा उत्साह असा उत्तम मेळ आहे. ऑलिम्पिकमध्ये आमचा इतिहास मोठा आहे, पण ५१ वर्षांपासून आम्ही विश्वचषक जिंकलेला नाही. त्यामुळे भारतीय हॉकीच्या इतिहासात स्वतःचे एक नवे सोनेरी पान लिहिणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे.’
क्रेग फुल्टन भारतीय मुख्य प्रशिक्षक