बंगळूरू; वृत्तसंस्था : बांगला देशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील निर्भेळ विजयानंतर आता भारताची नजर न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेकडे आहे. दोन्ही संघांतील पहिला सामना आज (बुधवार) पासून बंगळूरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. भारतीय स्टार्सना पाहण्यासाठी आतुर असलेल्या बंगळूरवासीयांची मात्र घोर निराशा होण्याची शक्यता आहे. कारण, बंगळूरमध्ये मंगळवारपासून जोरदार पाऊस पडत असून, आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे चिन्नास्वामीवर क्रिकेटचा खेळ होणार की, पावसाचा घोळ होणार, हे पाहावे लागेल.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत सध्या अव्वल स्थानावर आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही भारताने आपली उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवली, तर संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणार, हे जवळपास निश्चित होईल. न्यूझीलंड मालिकेनंतर भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. बंगळूरनंतर मालिकेतील दुसरा कसोटी सामना 24 ते 28 ऑक्टोबरदरम्यान पुण्यात खेळवला जाणार आहे. त्याचवेळी मालिकेतील तिसरा सामना मुंबईत 1 ते 5 नोव्हेंबरदरम्यान खेळवला जाणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत एकूण 62 कसोटी सामने खेळले गेले आहेत, ज्यात भारताने 22 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर 13 सामन्यांमध्ये विजय मिळवण्यात किवी संघाला यश आले आहे. याशिवाय दोन्ही संघांमधील 27 कसोटी सामने अनिर्णीत राहिले आहेत.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आजपासून सुरू होणार्या पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाने सोमवारी जोरदार सराव केला. संघ मंगळवारीही सकाळी सराव करणार होता. परंतु पावसामुळे सकाळी साडेनऊची सरावाची वेळ एका तासाने पुढे ढकलण्यात आली. परंतु, परिस्थितीत सुधारणा न झाल्याने शेवटी सराव सत्र रद्द करण्यात आले. बंगळूरमध्ये सप्टेंबर महिन्यात फारसा पाऊस पडला नाही. परंतु, ऑक्टोबरमध्ये मात्र सतत पाऊस होत आहे. कसोटीच्या पहिल्या दोन दिवसांत जवळपास 70 ते 90 टक्के पावसाची शक्यता आहे. याशिवाय इतर तीन दिवसही पावसाळी असतील. खेळपट्टी झाकून ठेवण्यात आली आहे, त्यामुळे ओलसर बनली तर वेगवान गोलंदाजांना याचा फायदा होईल. बंगळुरात संततधार पाऊस पडत असला तरी चिन्नास्वामी स्टेडियमची ड्रेनेज सिस्टीम अतिशय चांगल्या दर्जाची आहे. पाऊस थांबल्यापासून पुढे एका तासात खेळ सुरू होऊ शकतो.
भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल हा आजपासून सुरू होणार्या पहिल्या कसोटीत खेळण्याची शक्यता कमी आहे. मान आणि खांदा दुखत असल्याची तक्रार शुभमनने केली आहे. शुभमनने याबाबत संघ व्यवस्थापनाला कल्पना दिली आहे आणि पहिल्या कसोटीत त्याच्या खेळण्याबाबत बुधवारी सकाळी निर्णय घेतला जाईल. शुभमनच्या अनुपस्थितीत तिसर्या क्रमांकाला फलंदाजीसाठी के. एल. राहुल हा पर्याय भारताकडे आहे. त्यामुळे मधल्या फळीत सर्फराज खान किंवा ध्रुव ज्युरेल यांना संधी मिळू शकते. शिवाय, भारताकडे अक्षर पटेल हा अतिरिक्त अष्टपैलू खेळवण्याचा पर्यायही आहेच.