

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारत आणि पाकिस्तान यापुढे कोणत्याही द्विपक्षीय क्रीडा सामन्यांमध्ये सहभागी होणार नाहीत. तथापि, पुढील महिन्यात होणार्या बहुपक्षीय आशिया चषक स्पर्धेत खेळण्यापासून भारतीय क्रिकेट संघाला रोखले जाणार नाही, असे क्रीडा मंत्रालयाने गुरुवारी स्पष्ट केले. मंत्रालयाने पाकिस्तानसोबतच्या भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संबंधांवर विशेष लक्ष केंद्रित करणारे नवीन धोरण जाहीर केले आहे. हे धोरण तत्काळ प्रभावाने लागू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
मंत्रालयाच्या धोरणानुसार, पाकिस्तानचा समावेश असलेल्या क्रीडा स्पर्धांबाबत भारताची भूमिका ही त्या देशासोबतच्या सर्वसाधारण धोरणाचेच प्रतिबिंब आहे. धोरणात पुढे असेही नमूद केले आहे की, जेव्हा एकमेकांच्या देशात होणार्या द्विपक्षीय क्रीडा स्पर्धांचा प्रश्न येतो, तेव्हा भारतीय संघ पाकिस्तानातील स्पर्धांमध्ये सहभागी होणार नाही. त्याचप्रमाणे, पाकिस्तानी संघांनाही भारतात खेळण्याची परवानगी दिली जाणार नाही. तथापि, या धोरणाचा परिणाम बहुपक्षीय स्पर्धांवर होणार नाही. आशिया चषक ही एक बहुपक्षीय स्पर्धा असल्यामुळे आम्ही भारतीय क्रिकेट संघाला त्यात खेळण्यापासून रोखणार नाही, असे मंत्रालयातील सूत्राने यावेळी स्पष्ट केले. ऑलिम्पिक सनदेच्या नियमांचे पालन करण्यास बांधील आहोत, असेही या सूत्राने पुढे सांगितले आहे.