

मँचेस्टर; वृत्तसंस्था : जवळपास 157 षटके क्षेत्ररक्षण केल्यानंतर आणि पहिल्या डावाअखेर तब्बल 311 धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर आणि इतके कमी की काय म्हणून पहिल्याच षटकात दोन फलंदाज गारद झाल्याने येथील मँचेस्टर कसोटीत भारतासमोर बाका प्रसंग होता खरा, पण तरीही याचवेळी के. एल. राहुल (नाबाद 87) व कर्णधार शुभमन गिल (नाबाद 78) यांनी चक्क 62.1 षटके अभेद्य किल्ला लढवला आणि याच बळावर भारताने चौथ्या दिवसअखेर 2 बाद 174 मजल मारली.
तत्पूर्वी, कर्णधार बेन स्टोक्सच्या दोन वर्षांतील पहिल्या दमदार शतकाच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात 669 धावांचा डोंगर उभा केला. शनिवारी खेळाला सुरुवात झाली तेव्हा इंग्लंड 544/7 अशा स्थितीत होता आणि स्टोक्स 77 धावांवर खेळत होता. सुरुवातीला थोडा नर्व्हस दिसणार्या स्टोक्सने लवकरच आपला जम बसवला आणि दोन वर्षांचा शतकाचा दुष्काळ संपवला. शतक पूर्ण झाल्यावर त्याने आकाशाकडे पाहत आपल्या दिवंगत वडिलांना आदरांजली वाहिली. या खेळीदरम्यान स्टोक्सने अनेक विक्रम आपल्या नावे केले.
प्रत्युत्तरात, भारताची सुरुवात अगदीच खराब झाली. ख्रिस वोक्सने टाकलेल्या पहिल्याच षटकात भारताने सलग दोन चेंडूंवर दोन गडी गमावले. यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन खाते न उघडताच तंबूत परतले. यानंतर के. एल. राहुल व शुभमन गिल यांनी तब्बल 62.1 षटके खेळून काढत इंग्लंडची आघाडीदेखील बर्यापैकी कापून काढली. तूर्तास आज शेवटच्या दिवसाच्या खेळापूर्वी भारतीय संघ 137 धावांनी पिछाडीवर राहिला आहे.
1जसप्रीत बुमराहने आतापर्यंत खेळलेल्या 48 कसोटी सामन्यांत डावात 100 धावा बहाल करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
3 भारताने डावातील पहिल्याच षटकात दोन बळी गमावण्याची ही तिसरी वेळ आहे. 1977 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटीत तर 2014 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध ऑकलंड कसोटीत व भारतावर अशी नामुष्की आली होती.
19 गिल-राहुल यांनी दुसर्या डावात अर्धशतकी भागीदारी साकारली, त्यावेळी भारतासाठी 50 व त्याहून अधिक धावांची ही मालिकेतील 19 वी भागीदारी ठरली.
157.1 बॅझबॉल पर्वाला सुरुवात झाल्यानंतर इंग्लंडने आपल्या पहिला डावात 157.1 षटके फलंदाजी केली, हा देखील एक विक्रम आहे. यापूर्वी 2024 मध्ये पाकिस्तानविरुद्ध मुलतान कसोटीत त्यांनी 150 षटके फलंदाजी केली होती.