

चेन्नई; वृत्तसंस्था : अव्वल फळीतील फलंदाजांचे अपयश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पत्कराव्या लागलेल्या मोठ्या पराभवामुळे दबावात असलेला भारतीय संघ गुरुवारी (दि. 26) टी-20 विश्वचषकातील आपल्या दुसर्या ‘सुपर-8’ सामन्यात झिम्बाब्वेशी सामना करेल. मात्र, त्याआधी दिवसभरातील पहिल्या सामन्यात विंडीज-दक्षिण आफ्रिका लढतीवर देखील भारतीयांचे विशेष लक्ष असणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 धावांनी झालेल्या पराभवामुळे भारताचा नेट रनरेट -3.80 असा खाली घसरला आहे. स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारताला फलंदाजीतील त्रुटी दूर करून झिम्बाब्वेच्या आव्हानावर मात करावी लागेल. अभिषेक शर्मा आणि इशान किशन या जोडीने घरच्या मैदानावर चमकदार कामगिरी केली होती, पण विश्वचषकात अभिषेकच्या बॅटला जणू ग्रहण लागले आहे. पोटाच्या संसर्गातून सावरलेल्या अभिषेकला संथ खेळपट्ट्या आणि ऑफ-स्पिनर्सनी जखडून ठेवले आहे. त्याने चार सामन्यांत केवळ 3.75 च्या सरासरीने 15 धावा केल्या आहेत. अभिषेकला आपल्या नैसर्गिक फटकेबाजीला मुरड घालून खेळपट्टीवर टिकून राहण्यावर भर द्यावा लागेल.
तिलक वर्माचा स्ट्राईक रेट सध्या 118 असून, पॉवर-प्लेमधील फलंदाजासाठी हा आकडा चिंतेचा आहे. दुसरीकडे, सूर्यकुमार यादवने 180 धावा केल्या असल्या तरी त्याचा स्ट्राईक रेट (127) त्याच्या लौकिकाला साजेसा नाही. केवळ इशान किशन (स्ट्राईक रेट 193) एका बाजूने खिंड लढवत असून शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या यांच्या फटकेबाजीमुळे भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली आहे.
चेन्नईची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक ठरेल अशी आशा आहे. झिम्बाब्वेच्या ताफ्यात मुझाराबानी आणि एनगारावा यांसारखे वेगवान गोलंदाज असले, तरी त्यांचे फिरकी आक्रमण भारतासाठी फारसे घातक ठरणार नाही. भारताची गोलंदाजी भक्कम असून जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती झिम्बाब्वेला रोखण्यास सज्ज आहेत. विशेष म्हणजे, मागील सामन्यात बाहेर बसलेला उपकर्णधार अक्षर पटेल या सामन्यात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.
अव्वल फळीत लागोपाठ तीन डावखुरे फलंदाज (किशन, अभिषेक, तिलक) असल्याने प्रतिस्पर्धी संघ मुद्दाम ऑफ-स्पिनर्सचा वापर करत आहेत. हे रोखण्यासाठी संजू सॅमसन या उजव्या हाताच्या फलंदाजाचा समावेश करण्याचा पर्याय भारताकडे आहे, मात्र सॅमसन स्वतः सध्या फॉर्ममध्ये नाही. अशा स्थितीत सूर्याला तिसर्या क्रमांकावर बढती देऊन तिलक वर्माला चौथ्या क्रमांकावर पाठवण्याचा विचार संघ व्यवस्थापन करू शकते. नाणेफेकीवेळी याबाबतचे चित्र स्पष्ट होणे अपेक्षित आहे.
भारताचा आजचा सामना सायंकाळी 7 वाजता असला तरी त्यापूर्वी द. आफ्रिका-विंडीज यांच्यात दुपारी 3 वाजता होणारा सामना देखील भारतासाठी गुणतालिकेतील समीकरणांच्या द़ृष्टीने विशेष महत्त्वाचा असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय चाहत्यांचे या सामन्याकडेही विशेष लक्ष असणार आहे. भारताच्या द़ृष्टीने द. आफ्रिकेने विंडीजला नमवणे क्रमप्राप्त असणार आहे.