IND vs ENG 5th Test | भारतासाठी परिस्थिती ‘करो वा मरो’! ‘ओव्हल’ची लढाई आजपासून

बेन स्टोक्स दुखापतीमुळे बाहेर, आर्चरला विश्रांती, ब्रायडन कार्सही संघाबाहेर
IND vs ENG 5th Test
IND vs ENG 5th Test | भारतासाठी परिस्थिती ‘करो वा मरो’! ‘ओव्हल’ची लढाई आजपासूनPudhari File Photo
Published on
Updated on

लंडन : मैदानावर इंच न इंच भूमी लढवण्यासाठी रंगलेला पराकोटीचा संघर्ष, क्षणोक्षणी शाब्दिक चकमकी आणि थकल्या-भागल्या शरीरांनी दिलेली कडवी झुंज... अशा अनेक नाट्यमय घडामोडींनी गाजलेल्या भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचा पाचवा आणि निर्णायक रणसंग्राम आजपासून ओव्हलच्या मैदानावर रंगणार आहे. यजमान इंग्लंडकडे 2-1 अशी आघाडी असली, तरी ही केवळ मालिकेतील एक आकडेवारी आहे. या आकडेवारीपलीकडेही खरी लढाई आहे ती प्रतिष्ठेची, मैदानावर वर्चस्व सिद्ध करण्याची आणि शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानण्याच्या वृत्तीची!

शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघाने मालिकेत दाखवलेली आक्रमकता आणि इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचा प्रतिहल्ला, यामुळे या अंतिम सामन्यातही थरार शिगेला पोहोचणार हे निश्चित आहे. त्यामुळे, मालिकेचा निकाल काहीही लागो; पण क्रिकेटच्या या महानाट्याचा शेवटचा अंकही तितकाच अविस्मरणीय ठरेल, यात शंका नाही. आज पहिल्या दिवसाच्या खेळाला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरुवात होईल.

पाच सामन्यांच्या या मालिकेत यजमान इंग्लंड 2-1 ने आघाडीवर असल्याने, मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघासाठी हा सामना ‘करो वा मरो’ स्वरूपाचा आहे. संपूर्ण मालिकेत अपेक्षेपेक्षा सरस कामगिरी करणार्‍या आणि थकलेल्या शरीराला पणाला लावून लढणार्‍या युवा भारतीय संघाकडून ऐतिहासिक बरोबरी साधण्यासाठी अखेरच्या निर्णायक लढाईची अपेक्षा आहे. ही मालिका खर्‍या अर्थाने कसोटी क्रिकेटची नजाकत दाखवणारी ठरत आली आहे. विशेष म्हणजे, चारही सामन्यांचा निकाल शेवटच्या दिवसाच्या अंतिम सत्रात लागला. यावरून दोन्ही संघांमधील कडवी झुंज दिसून येते. मैदानातील शाब्दिक चकमकी आणि कर्णधारांमधील डावपेचांमुळे मालिकेतील वातावरण अधिकच तापले आहे, त्यामुळे अंतिम सामन्यातही मोठा ड्रामा अपेक्षित आहे.

गिलच्या नेतृत्वाखाली झुंजार कामगिरी

भारतीय संघाच्या या यशस्वी दौर्‍याचे केंद्रस्थान ठरला आहे, तो म्हणजे कर्णधार शुभमन गिल. एका नव्या आणि संक्रमणातून जाणार्‍या संघाचे नेतृत्व करताना 25 वर्षीय गिलने आतापर्यंत तब्बल 722 धावांचा डोंगर उभारला असून, एकाच मालिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या सुनील गावसकर यांच्या विक्रमापासून तो केवळ 52 धावा दूर आहे. फलंदाजीत के. एल. राहुलने सातत्यपूर्ण कामगिरी केली असली, तरी मधल्या फळीतील यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी ठेवण्याच्या संघाच्या रणनीतीमुळे शार्दूल ठाकूरचे स्थान कायम राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे फिरकीपटू कुलदीप यादवला पुन्हा एकदा संघाबाहेर बसावे लागू शकते.

ओव्हलच्या खेळपट्टीची अशीही तर्‍हा!

ओव्हलची येथील खेळपट्टी पहिल्या दिवशी सिमर्सना तर दुसर्‍या व तिसर्‍या दिवशी फलंदाजांना अनुकूल असते. त्यानंतर शेवटच्या दोन दिवसांत ती फिरकी गोलंदाजांना अधिक पोषक असते, असा आजवरचा अनुभव आहे. येथे नाणेफेक जिंकणारे कर्णधार प्रथम क्षेत्ररक्षणाला प्राधान्य देत आले आहेत.

अंतिम सामन्यासाठी संभाव्य संघ

भारत : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, रवींद्र जडेजा, ध्रुव ज्युरेल (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, कुलदीप यादव, अंशुल कंबोज, अर्शदीप सिंग, एन. जगदीशन (यष्टिरक्षक).

इंग्लंड : ओली पोप (कर्णधार), गस अ‍ॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, झॅक क्रॉऊली, लियाम डॉसन, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग, ख्रिस वोक्स.

ओली पोप सांभाळणार इंग्लंडच्या नेतृत्वाची धुरा

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि निर्णायक कसोटी सामन्यासाठी यजमान इंग्लंडने काही नवीन चेहर्‍यांना संधी दिली आहे. जेकब बेथेल सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करेल. तसेच, सरेचा वेगवान गोलंदाज गस अ‍ॅटकिन्सन आणि जेमी ओव्हरटन यांच्यासह नॉटिंगहॅमशायरचा वेगवान गोलंदाज जोश टंग यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या मालिकेत अनेक वादही पाहायला मिळाले. आता स्टोक्स आणि आर्चरसारख्या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत मालिका जिंकण्याचे मोठे आव्हान इंग्लंडसमोर असेल.

इंग्लिश संघात झालेली मोठी उलथापालथ भारताच्या पथ्यावर पडणार का?

गुरुवारपासून ओव्हल मैदानावर सुरू होणार्‍या या अंतिम कसोटीसाठी इंग्लंडने आपल्या संघात तीन मोठे बदल केले आहेत. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) दिलेल्या माहितीनुसार, कर्णधार बेन स्टोक्सला उजव्या खांद्याच्या दुखापतीमुळे संघातून वगळण्यात आले आहे.दुसरीकडे, तब्बल चार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर कसोटी संघात पुनरागमन करणार्‍या जोफ्रा आर्चरला कामाचा ताण लक्षात घेता विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बुमराहची अनुपस्थिती आणि संघ निवडीचे आव्हान

एकीकडे संघाचा आत्मविश्वास उंचावलेला असला, तरी कर्णधार गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासमोर संघ निवडीचे मोठे आव्हान आहे. प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला दुखापतीमुळे विश्रांती देण्यात आली असून, हा संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज आकाश दीपला संधी मिळण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news