

सेंच्युरियन : अवघ्या 22 वर्षांच्या तिलक वर्माने (नाबाद 107) मास्टरक्लास शतक झळकावल्यानंतर भारताने येथील तिसर्या टी-20 लढतीत दक्षिण आफ्रिकेला 11 धावांनी चित केले आणि 4 सामन्यांच्या या मालिकेत 2-1 अशी महत्त्वपूर्ण आघाडी प्राप्त केली. शतकवीर तिलकला अर्धशतकवीर अभिषेक शर्माची 50 धावा समयोचित साथ मिळाल्यानंतर भारताने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 219 धावा जमवल्या तर प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला 20 षटकांत 7 बाद 208 धावांपर्यंत मजल मारता आली.
विजयासाठी 220 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मार्को जान्सन (54), हेन्रिच क्लासेन (41), कर्णधार एडन मार्कराम (29) यांनी जोरदार प्रतिकार केला. मात्र, ठरावीक अंतराने गडी बाद होत राहिल्याने त्यांना विजयाने हुलकावणी दिली. शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीने लढवल्या गेलेल्या या लढतीत क्लासेनने 18 व्या षटकापर्यंत झुंज दिली. तर जान्सेनने हार्दिक पंड्याच्या 19 व्या षटकात 26 धावांची आतषबाजी केल्यानंतर अर्शदीपच्या शेवटच्या षटकातही एक षटकार खेचला यामुळे आफ्रिकेला अखेरच्या क्षणापर्यंत विजयाची आशा होती. मात्र, येथेही निर्णायक क्षणी अर्शदीपच यशस्वी ठरला आणि या जोरावर भारताला 11 धावांनी निसटता विजय संपादन करता आला. प्रारंभी रियान रेकल्टन व रिझा हेन्ड्रिक्स यांनी 3 षटकांत 27 धावांची सलामी दिली होती. या लढतीत दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकल्यानंतर भारताला प्रथम फलंदाजीला पाचारण केले होते.
22 वर्षीय तिलकने दक्षिण आफ्रिकेच्या जवळपास प्रत्येक गोलंदाजाचा सडेतोड समाचार घेताना 7 उत्तुंग षटकार व 8 सणसणीत चौकारांची आतषबाजी केली. अवघ्या 56 चेंडूंतील त्याची ही शतकी वादळी खेळी या सामन्याचे जणू चित्रच स्पष्ट करून गेली. दुसरीकडे, अभिषेक शर्माने आपली अपयशी मालिका खंडित करताना अवघ्या 25 चेंडूंत 5 षटक ार, 3 चौकारांसह अर्धशतक साजरे केले.
चौफेर फटकेबाजी करताना तिलकने संयम व आक्रमणावर उत्तम भर दिला. प्रारंभी संजू सॅमसन खाते उघडण्यापूर्वीच बाद झाल्यानंतर तिलकने अभिषेकसह 107 धावांची शानदार भागीदारी साकारली. केशव महाराजने मधल्या टप्प्यात भारताला दुहेरी धक्के दिले. पण, तिलकने आपला झंझावात कायम राखताना आपल्या शेवटच्या 52 धावा अवघ्या 22 चेंडूंतच फटकावल्या. तिलकच्या या झंझावातामुळेच कर्णधार सूर्यकुमार यादव (1), हार्दिक पंड्या (18), रिंकू सिंग (8) यांचे स्वस्तात गारद होण्याचा भारताला फारसा फटका बसला नाही. मार्को जान्सनने सॅमसनला बाद करत दक्षिण आफ्रिकेला जोरदार सुरुवात करून दिली होती. मात्र, तिलक व अभिषेक यांनी खेळपट्टी फलंदाजीला पोषक असल्याने त्याचा पुरेपूर लाभ घेण्यात अजिबात कसर सोडली नाही.
विजयासाठी 220 धावांचे कडवे आव्हान असताना मार्को जान्सन व हेन्रिच क्लासेन यांनी पूर्ण अनुभव पणाला लावत चौफेर फटकेबाजी केली आणि भारतीय गोलंदाज, क्षेत्ररक्षकांना अगदी सळो की पळो करून सोडले होते. हार्दिकच्या षटक ात तर हाणामारीचा सिलसिलाच सुरू केला होता. पण, अगदी अंतिम क्षणी जान्सन, क्लासेन तंबूत परतले आणि तेथेच भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले!