

नवी मुंबई (वृत्तसंस्था) : शफाली, स्मृती मानधनाचा फलंदाजीतील झंझावात आणि दीप्ती शर्माच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी ‘आयसीसी’ वन-डे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव केला आणि ‘आयसीसी’ महिला वन-डे विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील भारताच्या या पहिल्यावहिल्या जेतेपदाचा आनंद अगदी दूरदूरपर्यंत दुमदुमला. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अवघ्या महिला क्रिकेटपटूंसाठी आदर्शवत ठरणार्या या जेतेपदाने देशाच्या क्रीडा यशाच्या इतिहासात खर्या अर्थाने एक सुवर्ण अध्याय जोडला आहे.
गेल्या आठवड्यापर्यंत राखीव खेळाडूंमध्येही स्थान नसलेल्या 21 वर्षीय शफाली वर्माने, भारताच्या 7 बाद 298 धावसंख्येत 87 धावांची अविस्मरणीय खेळी केली. त्यानंतर तिने दोन महत्त्वपूर्ण बळी घेत दक्षिण आफ्रिकन महिला संघाला मोक्याच्या क्षणी पिछाडीवर टाकले. खचाखच भरलेल्या डी. वाय. पाटील स्टेडियमवरील या लढतीत भारताने दक्षिण आफ्रिकेला सर्वबाद 246 धावांवर रोखत ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले. अनुभवी दीप्ती शर्मा (5/39) आणि युवा श्री चरणी (1/48) यांनीही प्रचंड दबावाखाली आपली भूमिका चोख बजावत, हा अविस्मरणीय दिवस साकारण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
कपिलच्या शिलेदारांनी ‘लॉर्डस्’वर बलाढ्य वेस्ट इंडिजला पराभूत केल्यानंतर 25 जून 1983 हा दिवस जसा भारतीय पुरुष क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक कलाटणी देणारा क्षण म्हणून नोंदवला गेला, त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षातील 2 नोव्हेंबरचा दिवसदेखील महिला क्रिकेटच्या प्रवासातील एक मैलाचा दगड ठरेल, यात शंका नाही. भारतीय महिला क्रिकेटसाठी कल्पनेपलीकडचे योगदान देणार्या हरमनप्रीतसाठी 8 वर्षांपूर्वी नामी संधी साधता आली नव्हती; पण येथे यावेळी तिच्या खेळाडूंनी तिला निराश केले नाही. ज्या क्षणी तिने एक्स्ट्रा कव्हरला मागे धावत नॅदिन डी क्लर्कचा झेल घेतला, त्या क्षणाला समालोचक इयान बिशप यांनी ‘पिढ्यांना प्रेरणा देणारा क्षण’ असे त्याचे सार्थ वर्णन केले. भारतीय संघाने जेतेपदावर शिक्कामोर्तब केले, त्याच क्षणी स्टेडियममध्ये ए. आर. रहमान यांच्या ‘वंदे मातरम्’चे सूर दुमदुमले आणि या जेतेपदासह देशभरात जणू दिवाळी साजरी केली गेली.
दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 299 धावांचे तगडे आव्हान असताना कर्णधार लॉरा वोल्डार्टने तडफदार शतक फटकावत अगदी 42 व्या षटकापर्यंत जोरदार झुंज दिली; पण दीप्ती शर्माच्या 42 व्या षटकातील दुसर्या चेंडूवर लॉराचा अंदाज चुकला व येथेच या सामन्याला मोठी कलाटणी मिळाली. अमनज्योतच्या हातातून झेल दोनवेळा निसटत होता, त्यावेळी अवघ्या देशवासीयांच्या काळजाचे ठोके क्षणभर चुकलेच होते; पण सुदैवाने तिसर्या प्रयत्नात दीप्तीने अखेर यशस्वी झेल पूर्ण केला आणि भारताच्या मार्गातील सर्वात मोठा अडसर दूर झाला. तिने?घेतलेला हा झेल सामन्यातील टर्निंग पॉईंटदेखील ठरला.
विजयासाठी 299 धावांच्या कठीण आव्हानाचा पाठलाग करताना लॉरा व ब्रिट्स यांनी पाहता पाहता अर्धशतकी भागीदारी साकारली. कोणतेही दडपण न घेता केवळ संयमावर भर देत, तसेच खराब चेंडूंचा समाचार घेत त्यांनी धावफलक हलता ठेवण्यावर भर दिला होता. ही जोडी फोडण्यात भारतीय गोलंदाजांना यश मिळत नव्हते. अशा परिस्थितीत, अमनज्योत कौरने अप्रतिम क्षेत्ररक्षण करत ती कसर भरून काढली. तिने थेट यष्टींचा वेध घेत टाझमिन ब्रिट्सला ‘रनआऊट’ केले आणि भारताला पहिले मोठे यश मिळवून दिले. ब्रिट्सने 23 धावांची खेळी केली. अमनज्योतच्या या अचूक निशाण्याने भारताला मोठा दिलासा मिळवून दिला.
एका बाजूने ठरावीक अंतराने गडी बाद होण्याचा सिलसिला कायम असताना सलामीवीर व यापूर्वी उपांत्य लढतीतील दक्षिण आफ्रिकन विजयाची शिल्पकार लॉरा वोल्वार्ड हिने येथेही मागील फॉर्म कायम राखत एक बाजू लावून धरली होती. अवघ्या 45 चेंडूंत अर्धशतक साजरे केल्यानंतर तिने शतकही थाटात साजरे केले; पण शतकाचा आनंद साजरा न करता विजय मिळवून देणे, हेच आपले मुख्य लक्ष्य असल्याचेच तिने जणू अधोरेखित केले होते. मात्र, अंतिमत: तिची ही प्रयत्नांची पराकाष्ठा ती बाद झाली, तेथेच संपुष्टात आली.
भारतीय संघाची ‘गोल्डन आर्म’ शफाली वर्माने पुन्हा एकदा कमाल करत द. आफ्रिकेला दुहेरी झटके दिले. तिने 23 व्या षटकात धोकादायक मारीझान कॉपला केवळ 4 धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. शिवाय, सुने लूसलाही झेलबाद करत तिसरे सर्वात मोठे यश मिळवून दिले. ऑफ-स्टंपवर टाकलेल्या लेंथ चेंडूवर लुसने घाईने फटका मारण्याचा प्रयत्न केला. यात ती शफालीकडे परतीचा झेल देत तंबूत परतली. या विकेटनंतर कर्णधार हरमनप्रीतने तिच्यावर झेपावत आपला आनंद साजरा केला.