

पर्थ; वृत्तसंस्था : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेत उद्या रणशिंग फुंकले जाईल, त्यावेळी दोन्ही संघांचा येथे चांगलाच कस लागेल, अशी अपेक्षा आहे. यजमान ऑस्ट्रेलियाला मुख्य खेळाडूंच्या दुखापतीचे ग्रहण लागले असले तरी अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत निकराची झुंज देण्याची त्यांची खासियत पाहता, सामना अटीतटीचा झाला तर त्यात आश्चर्याचे कारण नसेल.
पर्थ, अॅडलेड आणि सिडनी येथे रंगणारी ही मालिका तमाम क्रिकेट रसिकांसाठी अर्थातच मेजवानी ठरणार आहे. विराट कोहली व रोहित शर्मा या मालिकेतील तिन्ही सामन्यांत उतरतील, त्यावेळी आपले सर्वस्व पणाला लावतील, याबाबत साशंकता असण्याचे कारणच नाही. एकीकडे, या दोघांना आपले नाणे आजही खणखणीत वाजवून दाखवता येते, हे सिद्ध करायचे असेल, दुसरीकडे, आपण 2027 चा विश्वचषक खेळू इच्छितो, याचीही वर्दी फॉर्म अधोरेखित करत द्यायची असणार आहे.
तसे पाहता, संघातील एकेक जागेसाठी असणारी कमालीची गळेकापू स्पर्धा पाहता, पुढील कोणतीही मालिका या दोघांपैकी एकाची किंवा दोघांचीही शेवटची ठरू शकते, या कटू सत्याची त्यांनाही जाणीव आहे आणि म्हणूनच या मालिकेतील एकेक सामना त्यांच्यासाठीही लाख मोलाचा असणार आहे. शुभमन गिल याच्यासाठी पूर्ण वेळ कर्णधार म्हणून ही पहिलीच वन डे मालिका असल्याने त्याच्यासाठीही याचे महत्त्व अनन्यसाधारण स्वरूपाचे असणार आहे.
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघाला कूपर कॉनोली, मार्नस लॅबुशेन, मॅथ्यू रेनशॉ यांसारखे खेळाडू कर्णधार मार्श आणि भारतासाठी नेहमीच डोकेदुखी ठरलेल्या ट्रॅव्हिस हेडला उत्तम साथ देतील, अशी आशा असेल.
जर कोहलीने आपल्या अचूक आणि संयमी खेळ्या पुन्हा दाखवल्या आणि रोहितने डावाच्या सुरुवातीला आपली विस्फोटक फटकेबाजी केली, तर हे दोन्ही दिग्गज संघात आपले स्थान दीर्घकाळ टिकवू शकतील. मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड हे ‘रो-को’ जोडीला पुन्हा एकदा रोखण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा ही जुनी जुगलबंदी पुन्हा पाहणे रोमांचक ठरेल, अशी चाहत्यांची अपेक्षा असेल.
या दोन्ही महान खेळाडूंना हे चांगलेच ठाऊक आहे की, त्यांच्याकडे आता नेतृत्वाची कवचकुंडले देखील नाहीत आणि अगदी यापूर्वी असणारा टाईम स्पेसही नाही. अर्थातच, त्यांना आताही प्रत्येक सामन्यागणिक उपयुक्तच योगदान द्यावे लागेल. याचे मुख्य कारण म्हणजे सध्याचे निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापन भविष्याचा, विशेषतः 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाचा विचार करून कठोर निर्णय घेण्यास मागेपुढे पाहत नाहीत.
रोहितच्या नेतृत्वाखालील 75 टक्के विजयाचा दर हा भारताच्या वन डे इतिहासातील उच्चांक आहे. गिलला आवडो वा न आवडो, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याची तुलना रोहितच्याच कामगिरीशी केली जाईल आणि प्रमुख वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीतही मिचेल मार्शच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ त्याच्यासमोर एक मोठे आव्हान उभे करत आहे. जर तो या परीक्षेत यशस्वी झाला, तर एक कर्णधार म्हणून त्याचा आत्मविश्वास कैकपटीने वाढेल, ज्याचा सकारात्मक परिणाम त्याच्या फलंदाजीवरही दिसून येईल.
संघ व्यवस्थापन रोहित आणि गिलची यशस्वी सलामीची जोडी कायम ठेवण्याची शक्यता आहे, तर यशस्वी जैस्वाल राखीव पर्याय असेल. याचा अर्थ कोहली तिसर्या, तर त्यानंतर श्रेयस अय्यर आणि के. एल. राहुल फलंदाजी करतील. राहुल यष्टिरक्षणाची दुहेरी जबाबदारीही सांभाळेल. दुखापतग्रस्त हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत अष्टपैलू म्हणून नितीश कुमार रेड्डीला पदार्पणाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांच्यासोबत तिसर्या वेगवान गोलंदाजाच्या भूमिकेसाठी हर्षित राणा आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यात स्पर्धा असेल. फिरकी विभागाची धुरा अक्षर पटेल आणि कुलदीप यादव सांभाळतील.