

धर्मशाळा; वृत्तसंस्था : भारत-द. आफ्रिका यांच्यातील तिसरी टी-20 रविवारी (दि. 14) खेळवली जाणार असून तडाखेबाज फलंदाज शुभमन गिल व सूर्यकुमार यादव यांच्यासमोर आता स्वत:ला सिद्ध करण्याचे आव्हान असणार आहे. आगामी 6 आठवड्यांत सुरू होणार्या टी-20 विश्वचषकापूर्वी ‘प्लॅन बी’वर विचार करण्यापूर्वी ही मालिका विशेष महत्त्वाची असेल. त्या पार्श्वभूमीवर, या दोन्ही दिग्गजांची प्रतिष्ठा पणास लागू शकते. आजच्या लढतीला सायंकाळी 7 वाजता सुरुवात होईल.
बर्फाच्छादित पर्वतरांगेच्या कुशीत, 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात भारत रविवारी प्रोटीजविरुद्ध तिसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी सज्ज होत असताना, भारतीय ड्रेसिंग रूममधील वातावरण मात्र कमालीचे तापलेले असणार आहे आणि याचे महत्त्वाचे कारण मुख्य खेळाडूंचा खराब फॉर्म हे असेल. सेट फलंदाज संजू सॅमसनला वगळून संघात स्थान मिळालेला त्याचा उपकर्णधार शुभमन गिल अद्याप प्रभाव दाखवू शकलेला नाही, हे चिंतेचे कारण आहे.
मार्को यान्सेन, नोर्त्झे, लुंगी एन्गिडी, ऑटनील बार्टमन आणि लुथो सिपामला यांचा समावेश असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजीने भारतीय खेळपट्ट्यांवर कशी गोलंदाजी करायची, हे दाखवून दिले आहे. एचपीसीए स्टेडियमची खेळपट्टी अतिरिक्त उसळीला पोषक असल्याने या गोलंदाजांचा सामना करणे विशेष आव्हानात्मक ठरेल. क्विंटन डी कॉकचे पुनरागमन, तसेच एडन मार्कराम, डेव्हॉल्ड ब्रेव्हिस, डोनोव्हन फरेरा, डेव्हिड मिलर आणि अष्टपैलू यान्सेन यांच्यामुळे दक्षिण आफ्रिकन संघ या लढतीतही भारतासमोर आणखी एकदा तगडे आव्हान उभे करेल, असे स्पष्ट संकेत आहेत.
कर्णधार असल्यामुळे, गेल्या एका वर्षापासून पूर्णपणे फॉर्ममध्ये नसतानाही सूर्यकुमारला टी-20 विश्वचषकात निश्चितच संधी मिळेल; पण सलामीवीर म्हणून मूळ निवड नसलेल्या गिलच्या बाबतीत असे म्हणता येणार नाही.