

बुलावायो; वृत्तसंस्था : 19 वर्षांखालील युवा विश्वचषक स्पर्धेत रविवार (दि. 1) भारत व पाकिस्तानचे कनिष्ठ संघ आमनेसामने भिडणार असून अवघ्या क्रिकेट वर्तुळाचे लक्ष या लढतीकडे असणार आहे. यापूर्वी 19 वर्षांखालील आशिया चषक फायनलमध्ये भारताला पाकिस्तानकडून दारुण पराभव पत्करावा लागला होता. त्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी येथे भारताकडे असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 1 वाजता या लढतीला प्रारंभ होईल.
यापूर्वी, गत डिसेंबरमध्ये दुबईत झालेल्या आशिया चषकाच्या साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानवर 90 धावांनी विजय मिळवला. मात्र, अंतिम फेरीत पाकिस्तानने भारताचा 191 धावांनी मोठा पराभव करत धक्का दिला होता. या पराभवाची सल भारतीय खेळाडूंच्या मनात नक्कीच असेल. या पार्श्वभूमीवर आजच्या लढतीत भारतीय युवा संघ अधिक त्वेषेने मैदानात उतरणे अपेक्षित आहे.
विश्वचषकात भारताची आतापर्यंतची वाटचाल दणदणीत राहिली आहे. भारताने अमेरिकेवर 6 गडी राखून विजय मिळवत मोहिमेची सुरुवात केली, त्यानंतर बांगला देश आणि न्यूझीलंडचा पराभव केला. पुढे पहिल्या सुपर सिक्स सामन्यात भारताने यजमान झिम्बाब्वेचा 204 धावांनी धुव्वा उडवला.
भारतीय फलंदाजीत यष्टिरक्षक अभिज्ञान कुंडू (4 सामन्यांत 183) आणि वैभव सूर्यवंशी (166) फॉर्मात आहेत. विहान मल्होत्राने झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद 109 धावांची खेळी करून आपला इरादा स्पष्ट केला आहे. गोलंदाजीत हेनिल पटेल (10 बळी) आणि डावखुरा वेगवान गोलंदाज उद्धव मोहन यांनी प्रभावी कामगिरी केली आहे.
दुसरीकडे, पाकिस्तानसाठी समीर मिन्हास हा सर्वात मोठा धोका ठरणार आहे. त्याने आशिया चषकाच्या फायनलमध्ये 172 धावांची खेळी केली होती आणि सध्याच्या स्पर्धेतही तो अर्धशतकी खेळी करत चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पाकिस्तानच्या अली रझाने आतापर्यंत 12 बळी घेतले असून भारतीय फलंदाजांना त्याचा सामना करण्यासाठी विशेष रणनीती आखावी लागेल.
आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी क्रिकेटचा देव मानल्या जाणार्या सचिन तेंडुलकरने मोलाचे मार्गदर्शन केले. बीसीसीआयने ‘एक्स’वर दिलेल्या माहितीनुसार, सचिनने या युवा खेळाडूंशी व्हर्च्युअल संवाद साधला. तांत्रिक कौशल्यासोबतच खेळातील सातत्य, शिस्त, लक्ष केंद्रित करणे आणि यश मिळाल्यावरही जमिनीवर पाय असणे किती महत्त्वाचे आहे, याचे धडे सचिनने खेळाडूंना दिले.
पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतीय सशस्त्र दलांनी राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर, भारत पाकिस्तानविरुद्ध आपले ‘हस्तांदोलन न करण्याचे’ धोरण या सामन्यातही कायम ठेवण्याची शक्यता आहे. आशिया चषकातील साखळी आणि अंतिम अशा दोन्ही सामन्यांत भारतीय संघाने पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करण्याचे टाळले होते.